29 January 2020

News Flash

धारावीच्या उद्योगाला डिजिटल ओळख!

अशा प्रकारचा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आल्याचे प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी सांगितले.

‘आयडीसी’च्या विद्यार्थ्यांने तयार केलेले उपकरण. 

‘आयडीसी’तील विद्यार्थ्यांचा अभिनव प्रकल्प

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली मुंबईच्या कुशीत वसलेल्या धारावी या महाकाय झोपडपट्टीत अब्जावधींची उलाढाल करणारे उद्योगही सुरू आहेत. एका विशिष्ट पठडीत उद्योग करणारी ही मंडळी आता आपल्या उद्योगाला वेगळय़ा वळणावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. नोव्हेंबर महिन्यात देशाच्या चलनातील पाचशे व एक हजार रुपयांची नोट रद्द केल्यानंतर या उद्योगांनी मोबाइल पाकिटांची मदत घेत डिजिटलकडे पहिले पाऊल टाकले. पण आता त्यांचे विपणन करण्यासाठीही डिजिटल माध्यमाचा वापर केला जाणार आहे. ही संकल्पना आयआयटी मुंबईतील अभिकल्प संस्थे (आयडीसी)तील चिन्मय परब या विद्यार्थ्यांने मांडली आणि ती यशस्वीही करून दाखविली.

गुगलने २०१५मध्ये बीकॉन उपकरण बाजारात आणले. या उपकरणाने काय करता येईल असे एक आव्हानही त्यांनी जगातील तमाम विद्यार्थ्यांपुढे ठेवले. यासाठी १०० उपकरणे ‘आयडीसी’मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. हे उपकरण इंटरनेटवर आधारित असून इंटरनेटशी जोडणारी कोणतीही यंत्रणा याद्वारे काम करू शकणार आहे. मग या उपकरणाचा काय वापर करता येईल, यावर ‘आयडीसी’मध्ये विचार सुरू झला. यात संस्थेत ‘इंटरअ‍ॅक्शन डिझाइन’ या अभ्यासक्रमात शिकत असलेल्या चिन्मय परब या विद्यार्थ्यांने उद्योगांसाठी या उपकरणाचा वापर करता येईल अशी संकल्पना मांडली. त्याच्या या संकल्पनेला आयडीसीतील प्रा. अनिरुद्ध जोशी आणि ब्रिटनमधील स्व्ॉनसी विद्यापीठातील प्रा. मॅट जॉन यांनी मार्गदर्शन केले व ती संकल्पना प्रत्यक्षात आणली.

अशा प्रकारचा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आल्याचे प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी सांगितले. सध्या हे उपकरण अकरा दुकानांमध्ये बसविण्यात आले असून येत्या काळात १०० दुकानांमध्ये बसविण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच आज हे उपकरण परदेशातून मागवावे लागते.

यामुळे त्याची किंमत ८०० रुपयांपर्यंत जाते पण जर भविष्यात या उपकरणाची निर्मिती आपल्या देशात झाली तर त्याचा खर्च ५०० ते ६०० रुपये इतकाच होणार असल्याचेही चिन्मयने नमूद केले.

ग्राहकांनाही फायदा

जेणेकरून धारावीत विशिष्ट गोष्टींची खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला या यंत्रणेचा फायदा होईल. तसेच दुकानदाराला त्याला पाहिजे तो ग्राहक मिळू शकतो, असा विश्वास चिन्मयने व्यक्त केला.

संकल्पना काय?

हा प्रकल्प धारावीत उभारत असताना चिन्मयने एक ‘अँड्रॉइड टूल’ विकसित केले. या टूलच्या माध्यमातून अवघ्या चार क्लिकवर धारावीतील दुकानदाराचे संकेतस्थळ विकसित होते. हे संकेतस्थळ विकसित झाल्यावर त्यात दुकानातील उत्पादनांची माहिती दिली जाते. दुकानात बीकॉन उपकरण ठेवलेले असते.या उपकरणाला जोडण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या स्मार्टफोन किंवा इंटरनेट जोडणी असलेल्या फोनमधले ब्लू-टूथ सुरू असणे आवश्यक आहे.  या उपकरणामुळे दुकानाच्या आसपासच्या परिसरात ब्लू-टूथ सुरू असलेल्या फोनवर क्रोम ब्राऊझरच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन जाते. या नोटिफिकेशनमध्ये दुकानाची थोडक्यात माहिती व एक लिंक दिलेली असते. ती लिंक सुरू केली की आपल्याला त्या दुकानात नेमकी कोणती उत्पादने आहेत व ती किती रुपयांना उपलब्ध आहेत याचा तपशील मिळतो.

धारावीची आजपर्यंतची ओळख ही एक झोपडपट्टी म्हणूनच होती. मात्र तेथे अनेक उद्योगही सुरू आहेत. यातील अनेक उद्योगांना भेटी देण्यासाठी तसेच धारावी नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी अनेक पर्यटकही तेथे येत असतात. या पर्यटकांना आपल्या दुकानाकडे आकर्षित करून घेण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल.’

चिन्मय परब, ‘आयडीसीचा विद्यार्थी

First Published on January 6, 2017 5:19 am

Web Title: digital identity industry in dharavi
Next Stories
1 खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ‘अंडरस्टॅण्डिंग’
2 पुरुषांसाठी बॅटबॉल, मोबाइल तर महिलांसाठी म्हाळसा पिन
3 शिवसेनेने पाठिंबा काढावा ही तो पवारांची इच्छा!
Just Now!
X