30 September 2020

News Flash

बस थांब्यांवर ‘डिजिटल’ फलक

प्रवाशांनी अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर बस थांब्याजवळ येताच मोबाइलमध्ये अलार्म वाजेल आणि योग्य थांब्यावरही प्रवासी उतरू शकतील, अशी सुविधा यात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बस आगमनाची वेळ समजणार; पहिल्या टप्प्यात २०० थांब्यांवर सुविधा

थांब्यांवर ताटकळत असलेल्या प्रवाशांना बसगाडय़ांची सद्य:स्थिती समजावी यासाठी त्यांची वेळ दर्शविणारे ‘डिजिटल’ फलक बसवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. मुंबईतील सहा हजार बस स्थानकांपैकी २०० बस थांब्यांवर पहिल्या टप्प्यात हे फलक बसवले जाणार आहेत. शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेन्ट सिस्टिम’अंतर्गत बसचे मार्ग, बसगाडय़ांची वेळ, बस स्थानके अशा सुविधा असलेले मोबाइल अ‍ॅप प्रवाशांच्या सेवेत आणले जाणार आहे. त्यामुळे बसगाडय़ांची सद्यस्थिती समजण्यास मदत मिळेल. या बरोबरच बस थांब्यांवर डिजिटल फलक लावून त्यावरही बसची माहिती देण्यात येईल. जेणेकरून ज्या प्रवाशांकडे मोबाईल अ‍ॅप नाही, त्यांना स्थानकावरील डिजिटल फलकाचा फायदा होईल. यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या बसची थांब्यावर तासन्तास वाट पाहणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. या मोबाईल अ‍ॅपचे सादरीकरण बेस्ट उपक्रमाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत केले. प्रवाशांनी अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर बस थांब्याजवळ येताच मोबाइलमध्ये अलार्म वाजेल आणि योग्य थांब्यावरही प्रवासी उतरू शकतील, अशी सुविधा यात आहे. प्रवाशाची एखादी वस्तू बसमध्ये राहिल्यास मोबाईल अ‍ॅपमध्ये जाऊन कुठल्या बसमध्ये ती वस्तू हरवली हे नमूद करून त्याची नोंद करता येईल. त्यामुळे हरवलेली वस्तू पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रस्त्यावरील गर्दीचा अंदाज घेण्याची यंत्रणा नसल्याने बस गर्दीत अडकली तर खरी वेळ कळण्यात प्रवाशांना अडचण येणार असल्याने मोबाइल अ‍ॅपसाठी गुगलचा डाटा वापरण्यात येणार आहे. त्यासाठी गुगलबरोबर करार होणार असल्याचेही स्पष्ट केले.

अ‍ॅपमध्ये त्रुटी असल्याची तक्रार

प्रवाशांसाठी सुरू  करण्यात येणाऱ्या या मोबाइल अ‍ॅपमध्ये काही त्रुटी असल्याची तक्रार आहे. या त्रुटी दूर करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार सुधारणा करण्याच्या सूचना बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी प्रशासनाला दिल्या. त्रुटी दूर केल्याशिवाय मोबाईल अ‍ॅप सुविधा प्रवाशांच्या सेवेत आणू नका, अशी मागणी समितीतील सदस्यांनीही केली. अ‍ॅपसाठी लागणारे जीपीएस नेटवर्क, अ‍ॅप त्वरित सुरू न होणे अशा अनेक त्रुटींवर यावेळी चर्चा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2019 2:39 am

Web Title: digital timetable in bus stop akp 94
Next Stories
1 दूध भेसळ करणारी टोळी अटकेत
2 डॉ. अब्दुल मिर्झाला अखेर अटक
3 प्रदूषणसंबंधीचा कृती आराखडा प्रलंबितच
Just Now!
X