निलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमुळे देखभालीसाठी कर्मचारीच नसल्याने मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक फोर्ट येथील ‘द एशियाटिक सोसायटी’ची वास्तू गेले दोन महिने धूळखात पडली आहे.

अनेकांच्या छायाचित्रात कैद झालेली आणि कितीतरी चित्रपटातील दृशांचा भाग झालेल्या सोसायटीच्या इमारतीला अनन्यसाधारण महत्व आहे. ही इमारत अनेक प्रज्ञावंताच्या पुस्तकांनी भरलेली आहे. आजही अनेक दिग्गज लेखक -विचारवंत इथे आवर्जून येतात. इमारतीत एशियाटिकचे गं्रथालय, ग्रंथालय संचालनालय, स्टँप कार्यालय, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय अशी विविध शासकीय कार्यालये आहेत. पण, इतकी कार्यालये असूनही इमारतीची देखभाल करायला कु णीही नाही.

इमारतीच्या पायऱ्या धुळीने माखलेल्या आहेत. पायऱ्यांवर विविध ठिकाणी कुत्र्यांची विष्ठा, सिगारेटीची पाकिटे, अर्धवट जळलेली थोटके, गुटख्याच्या पुडय़ा, कागदाचे, जुनाट वर्तमानपत्रांचे कपटे, पालापाचोळा असा कचरा साठलेला आहे. संबंध इमारतीच्या परिसरात प्लास्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, रिकामी टेट्रा पाकिटे, पाण्याच्या बाटल्या यांचा खच पडला आहे. टाळेबंदीमुळे कुणी लक्ष देत नसल्याने इथली दारे, दारांवरचे नक्षीदार उतार यांवर धूळ साचली आहे. इथले भव्य रेखीव खांब सध्या पान खावून थुंकण्याची जागा झाली आहे.

इमारतीच्या दुरवस्थेबाबत विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न करूनही प्रतिक्रि या मिळू शकली नाही. इमारतीत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाकडे चौकशी के ली असता प्रभारी संचालक सुभाष राठोड म्हणाले, की टाळेबंदीमुळे स्वच्छता कामगार आणि सुरक्षारक्षक नसल्याने इमारतीची देखरेख झालेली नाही. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली जाईल.