जात पडताळणीमध्ये जात प्रमाणपत्र बाद ठरल्यामुळे माजी उपमहापौर आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप पटेल यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा सभागृहात घाईघाईत करून शिवसेनेने भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाच्या स्थगितीचे कागदपत्र सादर करीत दिलीप पटेल यांना पुन्हा नगरसेवकपद बहाल करण्यास भाजपने शिवसेनेला भाग पाडले आहे.
दिलीप पटेल भाजपमधील ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षपद आणि भाजपचे गटनेतेपद भूषविले आहे. मागील पालिका निवडणुकीच्या वेळी दिलीप पटेल यांनी जुहू येथून निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. मात्र दिलीप पटेल यांनी खोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला होता.