गेली पंचाहत्तर वर्षे सातत्याने आपल्या गाण्यांनी रसिकांच्या मनांवर राज्य करणाऱ्या आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली.

‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे’ या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षी या पुरस्काराचा ७६ वा वर्धापन दिन असल्याने हा सोहळा मोठय़ा स्वरूपात होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यंदाच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांसाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे सोमवारी प्रभुकुंज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. या वेळी हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह उषा मंगेशकरही उपस्थित होत्या. प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार असून चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेता अनुपम खेर यांना आणि सामाजिक उद्योजक तेसाठी धनंजय दातार यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. साहित्यिक योगेश गौर यांना वाग्विलासिनी पुरस्कार, तर पत्रकारितेसाठी देण्यात येणारा श्रीराम गोगटे पुरस्कार राजीव खांडेकर यांना देण्यात येणार आहे. याशिवाय, सवरेत्कृष्ट नाटक म्हणून ‘अनन्या’ या नाटकाला मोहन वाघ पुरस्काराने गौरवण्यात येणार असून ‘सेंट्रल सोसायटी ऑफ एज्युकेशन’च्या अध्यक्षा मेरी बेल्लीहोंजी यांना सामाजिक कार्यासाठीचा आशा भोसले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  हा सोहळा २४ एप्रिलला षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी ६.१५ ते ७.३० या वेळेत होणार आहे.