लॉकडाउनचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. अनलॉक चार किंवा मिशन बिगीन अंतर्गत अनेक उद्योग-व्यवसाय सुरु झाले आहेत. पण हॉटेल व्यवसाय अजूनही पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायावर आजही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्र सरकारने एक जूनपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडायला अनुमती दिली. पण ही परवानगी फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीपुरता मर्यादीत आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्यावर अद्यापी बंदी कायम आहे.

लॉकडाउनमुळे हॉटेल उद्योग संकटात सापडला आहे. डाइन इन सर्व्हीस म्हणजे ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून खानपानाची परवानगी दिली नाही, तर अनेकांना आपली हॉटेल्स बंद करावी लागतील अशी स्थिती आहे. हॉटेल चालकांच्या विविध संघटनांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- “वात पेटली आहे, कधीही भडका होऊ शकतो”; मुंबईच्या डबेवाल्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

सरकारने राज्य परिवहन सेवा, मुंबईत बेस्ट आणि पुण्यात पीएमपीएमएलला पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. असे, असताना हॉटेलवर निर्बंध ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही असे रेस्टॉरंट मालकांनी सांगितले. परवानगी मिळाली तर, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग या सर्व नियमांचे पालन करु असे रेस्टॉरंट चालकांनी आश्वासन दिले आहे.

बुधवारी शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले व हॉटेल्सवरील अन्यायकारक निर्बंध उठवण्याची विनंती केली. सिद्धार्थ शिरोळे स्वत: हॉटेल व्यावसायिक आहेत. “कर्नाटक आणि पंजाब या राज्यांमध्ये ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून खानपानाची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारची गाइडलाइन असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार अजूनही तयार होत नाही. हे समजण्यापलीकडे आहे” असे प्रहा संघटनेचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले.