मुंबई : करोनाबधितांच्या निकट संपर्कातील ज्या लोकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसतील तर त्यांचे पाच दिवस विलगीकरण करून मग त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. लागण झाल्यापासून सात दिवसापर्यंत अशा व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

‘करोना कोविड १९’ आजाराची लागण झालेल्या अनेक बाधित व्यक्तींमध्ये आजाराची प्राथमिक लक्षणे दिसतातच असे नाही. अनेकदा लक्षणे न दिसणाऱ्यांची वैद्यकीय चाचणी केली असता, ती लागण झाल्यापासून साधारणपण सुरुवातीचे ७ दिवस ‘फॉल्स निगेटिव्ह’ येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. जे वस्तूत: बाधित आहेत, परंतु त्यांची वैद्यकीय चाचणी मात्र निगेटिव्ह येत आहे, अशा चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत ‘फॉल्स निगेटिव्ह टेस्ट’ असे संबोधले जाते. या पार्श्वभूमीवर ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांच्या निकट संपर्कातील ‘अति जोखमीच्या’ (हाय रिस्क) गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी ही किमान पाच दिवसांच्या विलगीकरणानंतर करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे.

ज्या व्यक्तींची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशा रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तात्काळ विलगीकरण केले जाते. अशा गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी यापूर्वी लगेचच करण्यात येत होती. त्यात अनेकदा चाचणी करोना नसल्याचे आढळत होते. काही दिवसानंतर मात्र त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत होती. त्यामुळे आता या व्यक्तींचे विलगीकरण  करून मग पाच दिवसानंतर  वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

सर्वाधिक चाचण्या मुंबईत

मुंबईत १३ एप्रिल २०२० पर्यंत मुंबईत तब्बल २७ हजार ३९७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. याच तारखेपर्यंत देशात एकूण २ लाख १७ हजार ५५४ एवढय़ा चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ देशातील एकूण चाचण्यांच्या १२.५९ टक्के एवढय़ा वैद्यकीय चाचण्या या केवळ मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आल्या आहेत.

१३ एप्रिल २०२०पर्यंतच्या आकडेवारीनुसार चाचण्या

’ मुंबई- २७ हजार ३९७

’ केरळ- १५ हजार ६८३

’ तामिळनाडू- १२ हजार ७४६

’ दिल्ली- ११ हजार ७०९

’ देशातील इतर सर्व राज्यांमध्ये एकत्रित- १ लाख ५० हजार १९