तंत्राच्या-यंत्राच्या आधारे जगताना माणसाच्या आयुष्यात सोय येते, मात्र त्याची सोयरीक हरवत जाते. रोजचे जगणे सोपे होते, पण नात्यातले बंध जपण्याइतपतही संवेदना, मानवी भावभावना उरत नाही, असा संदेश देणारी ‘बंध नायलॉनचे’ ही अंबर हडप लिखित एकांकिका खूप गाजली. दिग्दर्शक जतीन वागळे यांनी हीच एकांकिका त्याच नावाने मोठय़ा पडद्यावर आणली आहे.
‘बंध नायलॉनचे’ हा चित्रपट करताना त्याचा विषय वैयक्तिक आयुष्यातही अनुभवत होतो, असे जतीन वागळे यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. माझी मुलगी अडीच वर्षांची होती आणि कामानिमित्त बाहेर जाताना मी नेहमीप्रमाणे तिच्या आवडीचे कार्टुन्स तिला लावून द्यायचो. तासाभरात परतायचे आश्वासन असायचे, पण मग कधी आणखी उशीर व्हायचा. एकदा घरी लवकर परतलो मात्र ती तिच्या कार्टुनमध्येच रमलेली होती. तासाभराच्या कामाच्या बदल्यात डोरॅमोन आणि शिनचॅनसारख्या कोर्टुन्सनी माझी कसर भरून काढली होती. तिला त्या क्षणी तरी माझी गरज उरली नव्हती. या वरवर दिसणाऱ्या प्रसंगातील धोका मला जाणवला आणि नेमकी त्याच वेळी अंबरने ही कथा ऐकवली. तेव्हा ही कथा चित्रपटाच्या माध्यमातून आणायचीच, असा निर्णय घेतल्याचे जतीनने सांगितले. ‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटात सुबोध भावे, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, श्रुती मराठे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर अशी भली मोठी कलाकारांची यादी आहे. या चित्रपटाची कथा सर्वसाधारण नव्हती. हा विषय प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचवायचा असेल तर त्याला तेवढेच ताकदीचे कलाकार हवे होते. सुदैवाने, एकेक करत चांगले कलाकार या चित्रपटाशी जोडले गेल्याबद्दल दिग्दर्शकाने समाधान व्यक्त केले.
दिग्दर्शक म्हणून इतक्या सगळ्या मोठय़ा कलाकारांबरोबर एकाच वेळी काम करताना काहीच अडचण आली नाही. उलट, त्यांनीच आपला विश्वास वाढवल्याचे जतीनने सांगितले. प्रत्येक चित्रपटाचा काही एक संदर्भ असतो. म्हणजे राजकीय चित्रपट असेल तर अरे हा ‘सिंहासन’च्या पुढे जाऊच शकत नाही, असे काही मापदंड असतात. जे दिग्दर्शकाला आपली कलाकृती नेमकी कुठे, कशा मार्गाने आकार घेते आहे, याबद्दल दिशा देतात. ‘बंध नायलॉनचे’बाबत विषयच वेगळा असल्याने आपण करतो आहोत ते बरोबर आहे की नाही, याबद्दल सतत धाकधूक असायची. मात्र, सुबोध किंवा महेश मांजरेकरांसारख्या कलाकारांनी जे करतो आहोत ते योग्य असल्याचा विश्वास दिल्यानेच पुढे जाणे सोपे झाले, असेही त्याने सांगितले. एक कलाकारांच्या तारखा वगळता चित्रपट करताना कुठलीही समस्या आली नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. गाजलेल्या एकांकिकांवर चित्रपट करण्याचे धाडस फार कमी वेळा केले जाते, कारण कित्येकदा चित्रपटातून तो विषय वाढवणे कठीण होऊन बसते. ‘बंध नायलॉनचे’च्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगली एकांकिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.