आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला कॉग्रेसकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बालिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना राज्य सरकारकडून पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे.

‘इंदू सरकार’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी भांडारकर हे दोन दिवसांपूर्वी नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, यावेळी कॉग्रेस सामर्थकांनी भांडारकर यांना आपल्या हॉटेलमधूनही बाहेर येऊ दिले नव्हते. त्याआधीही पुण्यातही असाच प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भांडारकर यांना ही सुरक्षा पुरवली आहे.

रविवारी मधुर भांडारकर यांची नागपुरमध्ये रामदास पेठ भागातील हॉटेल सेंटर पॉईंट येथे थांबले होते. त्यांनी येथील गांधीनगर भागातील पोर्ट ओ गोमेज रेस्तरॉंमध्ये सकाळी साडे अकराच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, भांडारकर थांबलेल्या हॉटेल बाहेर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आणि चित्रपट तसेच भांडारकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आणखी वाद निर्माण होऊ नये यासाठी भांडारकर यांनी आपली पत्रकार परिषदच रद्द केली होती. यावेळी कॉंग्रेसचे १० ते १२ कार्यकर्ते हे पत्रकार परिषदेच्या ठिकाणीही हजर होते. मात्र पत्रकार परिषदच रद्द झाल्याने ते काहीही करू शकले नाहीत.

या घटनेनंतर भांडारकर यांनी टि्वट करून “तुमचा या गुंडगिरीला पाठींबा आहे का? मला माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?” असा प्रश्न कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केला होता. दरम्यान, या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्याबाबत कोणतीही चुकीची माहिती आम्ही मांडलेली नाही. तसे करायचे असतेच तर मी शंभर टक्के माहितीपटच बनवला असता, चित्रपट बनवला नसता. असे स्पष्टीकरण मधुर भांडारकर यांनी दिले आहे.

‘इंदू सरकार’ हा चित्रपट १९७५ ते १९७७ या काळातील देशातील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. यातील प्रमुख पात्रे ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्यावर बेतलेले आहे.
[jwplayer HCfxThG9]