सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने त्याचं आयुष्य अशा प्रकारे संपवल्यानंतर सगळी सिनेसृष्टीच हादरुन गेली. मात्र त्यानंतर त्याच्या आत्महत्येवरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले. सुशांत हा घराणेशाहीचा आणि सिनेसृष्टीतील गटबाजीचा बळी असल्याचं बोललं गेलं. ज्यानंतर पोलिसांनी या अँगलनेही काहीजणांच्या चौकश्या केल्या. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनाही मुंबई पोलिसांनी काही प्रश्न विचारले. ज्याची उत्तरं त्यांनी इमेलद्वारे दिली आहेत. “पानी या यशराजच्या सिनेमात सुशांत काम करणार होता. मात्र माझ्यात आणि आदित्य चोप्रा यांच्यात वाद झाले. त्यामुळे हा सिनेमा रद्द झाला. हा सिनेमा कुणीही करायला तयार नव्हतं. हा सिनेमा बंद झाल्याचं कळताच सुशांत माझ्या घरी आला आणि खांद्यावर डोकं ठेवून रडला” असंही शेखर कपूर यांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी सुशांतची आत्महत्या ही सिनेसृ्ष्टीतील गटबाजीमुळे झाली का? हे तपासण्यासाठी आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त लोकांचे जबाब नोंदवले आहेत. शेखर कपूर हे सध्या मुंबईत नाहीत. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी इमेल द्वारे दिली आहेत.

शेखर कपूर यांनी काय म्हटलं आहे?
सुशांत पानी या सिनेमासाठी खूपच उत्सुक होता. २०१३ पासूनच या सिनेमाची चर्चा होती. या सिनेमाचं बजेट १५० कोटी होतं. त्यानंतर यशराज फिल्म्स या सिनेमाची निर्मिती करणार हे २०१४ मध्ये ठरलं. यशराजने सिनेमाच्या प्री प्रॉडक्शनसाठी ७ ते ८ कोटी रुपये खर्च केल्याचंही सांगण्यात आलं. या सिनेमासाठी सुशांतला साइन करण्यात आलं होतं. त्याच्या तारखाही निश्चित झाल्या. ३ ते ४ वर्षांमध्ये हा सिनेमा पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. सुशांत या सिनेमात गोरा ही भूमिका साकारणार होता. या भूमिकेसाठी तो जीव तोडून मेहनतही घेत होता. या सिनेमाचं दिग्दर्शन मी करत होतो त्यामुळे तो प्रॉडक्शनच्या ठिकाणीही तो येऊन बसायचा. पानी या सिनेमासाठी त्याने इतर मोठे प्रोजेक्टही नाकारले होते. दरम्यान एक दिवस सिनेमातल्या कंटेटवरुन आदित्या चोप्रा आणि माझ्यात काही वाद झाले. आदित्य चोप्रांच्या यशराजने या सिनेमातून अंग काढून घेतलं. त्यामुळे हा सिनेमा यशराजपासून वेगळा झाला. यानंतर आम्ही अनेक प्रॉडक्शन हाऊससोबत चर्चा केली. मात्र सुशांतला घेऊन सिनेमा करण्यास कुणीही तयार झालं नाही. त्यांना प्रसिद्ध चेहरा हवा होता.

सुशांतला जेव्हा हे समजलं की सिनेमा तयार होणार नाही तेव्हा पूर्णपणे कोसळला. त्यादिवशी संध्याकाळी तो माझ्याकडे आला. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तो ढसाढसा रडला. त्याला तसं रडताना पाहून मीपण रडणं थांबवू शकलो नाही. या सिनेमात माझ्यापेक्षा सुशांत जास्त गुंतला होता हे मला जाणवलं. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांतर काही दिवसांनी मी लंडनला गेलो. त्यामुळे सुशांत आणि माझ्यात काही संवाद झाला नाही. त्यानंतर काही महिन्यांनी सुशांतने सांगितलं की त्याने यशराजसोबतचा करार तोडला आहे. एवढंच नाही तर हिंदी सिनेसृ्ष्टीत त्याला चांगली वागणूक दिली जात नाही असंही सुशांतने सांगितलं होतं असंही शेखर कपूर त्यांच्या इमेलमध्ये म्हटलं आहे. मागील सहा ते सात महिन्यांपासून सुशांतसोबत माझा काहीही संपर्क नव्हता असंही शेखर कपूर यांनी सांगितलं आहे. ‘न्यूज १८’ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

हे पण वाचा : ‘दिल बेचारा’च्या पॅकअपचा दिवस; सुशांतचा व्हिडीओ आला समोर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत नेटफ्लिक्स ओरिजनल फिल्म्सचे संचालक, सुशांतची अत्यंत जवळची मैत्री रिया चक्रवर्ती, सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासह ३० पेक्षा जास्त लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे.