News Flash

तंत्रशिक्षण संचालनालयाचा कारभार अधांतरी!

गेल्या दशकात तंत्रशिक्षण महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली.

संचालक, सहसंचालकांना मुदतवाढ देण्याबाबत संभ्रम

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सुमारे दोन हजार महाविद्यालयांच्या कारभाराच्या नियमनाची जबाबदारी असलेल्या  ‘तंत्रशिक्षण संचालनालया’चा कारभार अधिकाऱ्यांच्या नियुक्तींअभावी अधांतरी चालला आहे. संचालनालयाचे संचालक, सहसंचालकांची मुदत संपल्यानंतरही त्यांच्या मुदतवाढीचे आदेशही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने न काढल्यामुळे नेमक्या कोणत्या अधिकार कक्षेत आपण काम करू शकतो असा प्रश्न या अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

गेल्या दशकात तंत्रशिक्षण महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली. मात्र त्या तुलनेत संचालनालयातील अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली नाही. आजघडीला या विभागातील आठशे पदे रिक्त आहेत. तसेच, सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही अध्यापकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे, या महाविद्यालयांना संबंधित विद्यापीठे व ‘एआयसीटीई’कडून मान्यता कशी मिळते हा एक प्रश्नच असल्याचे येथील एका अधिकाऱ्यानेच सांगितले.

तीन अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य हंगामी असून तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. सु. का. महाजन यांना गेली आठ वर्षे प्रभारी म्हणून ठेवण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असताना आता हंगामी म्हणून मुदत संपल्यानंतर गेले वर्षभर त्यांच्या मुदतवाढीसंदर्भात कोणतेही आदेशच काढल्यात आलेले नाहीत. या शिवाय अभय वाघ, प्रमोद नाईक आणि टी. गुलाबराव यांना कोणत्या अधिकारकक्षेत पदोन्नती दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुदलात संचालनालयाचे कोणतेही नवीन सेवा नियम नसताना तीन अधिकाऱ्यांना २००८ मध्ये प्रथम उपसंचालक म्हणून तात्पुरती पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर २०११ मध्ये ही पदोन्नती नियमाकडे दुर्लक्ष करून नियमित करण्यात आली. एवढेच नव्हे तर अवघ्या काही महिन्यांतच या सर्वाना सहसंचालक म्हणून पुन्हा पदोन्नती देण्यात आली; परंतु २०१४ पासून आजपर्यंत सहसंचालक म्हणून दिलेल्या या पदोन्नतीलाही मंत्रालयातील ‘बाबूं’नी मुदतवाढ दिलेली नाही.

उफराटा कारभार..

एकीकडे नवीन सेवा प्रवेश नियम तयार करायचे नाहीत तर दुसरीकडे हंगामी म्हणूनही आदेश न काढताच संचालनालयाचा कारभार हाकायचा असा उफराटा कारभार सुरू आहे. तंत्र शिक्षणातील रिक्त पदांवरून विरोधी पक्षात असताना जोरदार आरडा ओरडा करणारी भाजप आता सत्तेवर आली असून त्यांच्याकडेच या विभागाची जबाबदारी असतानाही कारभार मात्र मागच्या पानावरून पुढे असाच सुरू असल्याचा टोला विभागातील अधिकारी मारत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2016 12:15 am

Web Title: directorate of technical education management still not pending
Next Stories
1 उत्तरपत्रिकांची ऑनलाइन तपासणी विचाराधीन -तावडे
2 परीक्षांबरोबरच आंदोलनांचीही चाहूल
3 यूपीएससीच्या दुकानदारीला अभाविपचाही विरोध
Just Now!
X