जन्मदात्या आईनेच वाऱ्यावर सोडून दिलेल्या गतिमंद गौरवने नुकतेच १६ व्या वर्षांत पदार्पण केले. सेरेब्रल पाल्सीसारख्या गंभीर आजारामुळे व्यंग व दृष्टिदोष असलेल्या गौरवचे पालनपोषण माटुंगा येथील इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन अँड चाइल्ड वेल्फेअर (आयएपीए) या संस्थेच्या मदतीने एका mu04प्रेमळ कुटुंबात झाले. मात्र, अनेक वर्षे प्रयत्न करूनही गौरवला कोणी दत्तक घेत नसल्याने याच प्रेमळ कुटुंबाने गौरवच्या आयुष्याला आकार देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडामध्ये नोकरी करणाऱ्या दीपक व उषा कांबळे या दाम्पत्याने गौरवला दत्तक घेतले आहे.
गौरवला सेरेब्रल पाल्सी आजार असल्याने त्याला अर्धागवायूचा झटका आला आणि त्यातून दृष्टिदोषही निर्माण झाला. त्यामुळे त्याच्या आईने त्याला आयएपीएकडे सोपवले. ही संस्था अनाथ मुलांना दत्तक देण्याचे काम करते. दत्तक पालक मिळेपर्यंत अनाथांना पर्यायी कुटुंबात ठेवण्यात येते व त्यांच्या देखभालीसाठीचा खर्च संस्थेकडून दिला जातो. त्यानुसार संस्थेने गौरवला मथुरा कांबळे यांच्याकडे सोपवले. मथुरा यांनी आठ वर्षे गौरवचा सांभाळ केला. मात्र, त्यांची साठी उलटल्यावर मथुरा यांचे चिरंजीव दीपक व सून उषा यांनी गौरवचे पालकत्व स्वीकारले. चार मुली पदरी असतानाही या दाम्पत्याने गौरवचा स्वीकार केला. दीपक यांची बहीण सुजाता यांनी गतिमंद मुलांसाठीचे विशेष प्रशिक्षणही घेतले आहे. विवाहानंतर त्यांनी गौरवला पुण्याला नेले. वानवडी येथील विशेष मुलांच्या शाळेत गौरव शिकत आहे. गौरवला मराठी व हिंदीव्यतिरिक्त इंग्रजीही येते. अनेक स्पर्धामध्ये भाग घेऊन त्याने बक्षिसेही मिळविली असल्याचे आयएपीए संस्थेच्या सविता नागपूरकर यांनी सांगितले. संस्थेकडे मूल आल्यावर शक्यतो एक-दोन वर्षांत त्याचे दत्तकविधान होते. मात्र, आजारामुळे गौरवला दत्तक घेण्यास कोणीही पुढे आले नाही. तरीही संस्थेने त्याच्या उपचारांसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मुले सज्ञान होईपर्यंत दत्तकविधान झाले नाही, तर संस्थेला त्यांचा सांभाळ करणे कठीण होते आणि ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकले नाही, तर उर्वरित आयुष्यभर त्याला कोणी सांभाळायचे, हा प्रश्न निर्माण होत असल्याचे संस्थेच्या सल्लागार नजमा गोरियावाला यांनी सांगितले.
पण ज्या गौरवला गेली १५ वर्षे आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती म्हणून प्रेमाने सांभाळले, त्याला बाहेर पाठवायचे नाही आणि निष्ठुर जगात निराधारही ठेवायचे नाही, या भावनेतून आपणच त्याला कायदेशीर दत्तक घ्यायचे, असे दीपक व उषा कांबळे यांनी ठरविले. म्हाडामध्ये क्लार्कची नोकरी, मध्यमवर्गीय कुटुंब आणि चार मुली असलेल्या कांबळे कुटुंबाने कोणताही व्यावहारिक विचार न करता हा निर्णय घेतला. संस्थेच्या नियमाप्रमाणे दत्तकविधान झाल्यावर मुलाचा सर्व खर्च त्याच्या आईवडिलांना करावा लागतो. पण गौरवचा आजार आणि कांबळे कुटुंबाने मायेने त्याचा सांभाळ केल्याने उपचारांच्या खर्चाचा वाटा पुढील काही काळ संस्था उचलणार आहे, असे नागपूरकर यांनी सांगितले.
मोठेपणा नाही
गौरव आमच्या घरातीलच एक असून त्याला आमचा लळा आहे. त्यामुळे त्याला दत्तक घेऊन आम्ही फार काही विशेष केलेले नाही, असे कांबळे दाम्पत्य नम्रपणाने सांगते. कोणी आर्थिक मदत दिली तर ठीक, नाहीतर स्वबळावर त्याचे पालनपोषण व वैद्यकीय खर्च करण्याचे त्यांनी ठरविले आहे. कांबळे यांची सातारा जिल्ह्य़ात थोडी शेती व जागा आहे. गौरवला तेथे काहीतरी संस्था व उद्योग सुरू करून देऊन त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्याची कांबळे यांची जिद्द आहे. दत्तकविधान होईपर्यंत अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले असून त्यासाठी एखादी जागा मिळावी, अशी विनंतीही त्यांनी म्हाडाकडे केली आहे. मथुरा आजीनेही गौरवच्या नावावरच आपली पुंजी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गौरव गतिमंद असला तरी त्याला सारे काही समजते. आपले सर्व कुटुंबावर प्रेम असल्याचे त्याने दत्तकविधानास मंजुरी देणाऱ्या न्यायाधीशांना दिलेल्या पत्रातही लिहिले आहे. गौरवसारख्या मुलांच्या मदतीसाठी – आयएपीए – कनारा ब्रदरहूड सोसायटी, फ्लॅट क्र. ७, मोगल लेन, माटुंगा (प.), मुंबई ४०००१६. दूरध्वनी २४३०७०७६, २४३७४९३८.