उपनगरीय गाडय़ांत असलेल्या अपंगांच्या डब्यात अपंगांनाच प्राधान्य द्यावे, असा नियम आहे. मात्र, गर्दीच्या नावाखाली धडधाकट प्रवासी या डब्यातून सर्रास प्रवास करतात. त्यामुळे अपंगांनाच या डब्यात जागा मिळत नाही. अपंगांनी विरोध केल्यास इतर प्रवाशांकडून अरेरावी केली जाते. असाच प्रकार शुक्रवारी सायंकाळी डोंबिवली स्थानकात घडला. या घटनेत नंदकुमार जोशी (६०, रा. कल्याण) हे जखमी झाले.
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून कसाऱ्याकडे जाणारी लोकल डोंबिवली स्थानकात आली असता एका तरुणाने अपंगांच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, डब्यातील अपंगांनी या तरुणाला विरोध केला. त्यातून तरुण व डब्यातील अपंग यांच्यात वाद निर्माण झाला. गाडीने डोंबिवली स्थानक सोडताच संतप्त झालेल्या तरुणाने नंदकुमार जोशी यांना डब्यातून ढकलून दिले. जोशी यांच्या हातापायाला जबर दुखापत झाली आहे. गाडी कल्याण स्थानकात येताच अपंगांनी या प्रकाराची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले. डोंबिवली रेल्वे पोलिसांनीही या प्रकाराला दुजोरा दिला.