उमेदीची वीस वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करूनही केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही, आता शिवसेना-भाजपबरोबर समझोता केला, परंतु राज्यभेची खासदारकी कुणी द्यायला तयार नाही, त्यामुळे सध्या रिपब्लिकन पक्षामध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत आणि शिवसेना-भाजपमध्ये फरक तो काय, असा प्रश्न आरपीआयचे कार्यकर्ते करू लागले आहेत.
केंद्रात २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आले, त्या वेळी आठवले यांनी मंत्रिपद मिळावे, यासाठी प्रयत्न केले; परंतु त्या वेळी राष्ट्रवादीने त्यांच्याकडे मंत्रिपदाचा कोटा कमी आहे, असे सांगून काँग्रेसकडे मंत्रिपद मागावे, असा त्यांना सल्ला दिला. तुमची युती राष्ट्रवादीबरोबर आहे, त्यामुळे त्यांनी शिफारस केली तर मंत्रिपद देण्यास आमची काही हरकत नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला. परिणामी आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळालेच नाही. २००९ च्या निवडणुकीत तर त्यांचा पराभवच झाला. त्याचा राग म्हणून त्यांनी थेट शिवसेनेशी हातमिळवणी केली.    
शिवसेना-भाजपबरोबर युती केल्याच्या बदल्यात आठवले यांना राज्यसभेची खासदारकी हवी आहे. जानेवारीमध्ये रिक्त होणाऱ्या शिवसेनेच्या एका जागेवर त्यांचा डोळा आहे. त्यासाठी भाजपकडे प्रयत्न करू या,  अशी उद्धव ठाकरे यांनी आठवले यांची समजूत काढल्याचे समजते, तर शिवसेनेने त्यांना खासदारकी द्यावी, अशी भूमिका भाजपने घेतल्याचे सांगण्यात येते. उद्धव यांनी आरपीआयला लोकसभेच्या तीन जागा देण्याची आणि राज्यसभेच्या खासदारकीसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे आशावादी आहोत, असे आठवले यांनी सांगितले.