इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ५ ते ५० टक्क्यांपर्यंत सवलती

देशात १ जुलैपासून लागू होणाऱ्या ‘वस्तू व सेवा करा’मुळे (जीएसटी) इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत होणारी किमान पाच टक्क्यांची वाढ गृहीत धरीत ग्राहकांनी या वस्तूंच्या खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. तर ग्राहकांचा कल लक्षात घेऊन अनेक मोठय़ा विक्रेत्यांनी जीएसटीपूर्व सेल लावत वस्तूंवर पाचपासून थेट ५० टक्क्यांपर्यंतची सवलत देऊ केली आहे.

वस्तू व सेवा कर लागू झाल्यावर नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत व कोणत्या वस्तूंच्या कमी होणार आहेत, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. यातच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत किमान पाच व कमाल २५ टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याची चर्चा आहे. याचाच फायदा घेत विजय सेल्स, स्नेहांजली, क्रोमा, कोहिनूरसारख्या बडय़ा विक्रेत्या ब्रॅण्ड्सनी ‘जीएसटी सेल’चे आयोजन करीत सवलतींचा पाऊस पाडला आहे. १ जुलैपूर्वी वस्तूंची खरेदी केल्यास त्या जुन्या किमतीत व त्याही सवलतीच्या दरात मिळतील, अशा जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. यात सॅमसंगसारख्या कंपन्यांनी टीव्हीसोबत ‘डीटीएच’ मोफत देऊ केला आहे. तर एसीसाठी वॉरंटी कालावधीत आणि मोफत सेवा कालावधीत वाढ केली आहे. याशिवाय पुमा, बाटा, जॅक अ‍ॅण्ड जॉन्स, यूएस पोलोसारख्या कंपन्यांनी यापूर्वीच देशभरातील बाजारात सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत.

ई-व्यापार संकेतस्थळांवरही सवलतीत विक्री केली जात आहे. फ्लिपकार्टने १० ते १८ जून या कालावधीत सुमारे ५० ब्रॅण्ड्सच्या उत्पादनांची विक्री सवलतीच्या दरात केली. याचबरोबर ग्राहकांना आकर्षक बक्षिसेही देऊ केली आहेत. विविध दुकानांमध्ये मुख्यत्वेकरून एसी, टीव्ही, मायक्रोव्हेव्ह, फ्रीज अशा उत्पादनांसाठी सर्वाधिक सवलती आहेत. मोबाइल व इतर गॅजेट्सवर मात्र १० ते १५ टक्क्यांपर्यंतच सवलती देण्यात आल्या आहेत. बडय़ा ब्रॅण्ड्सच्या सवलतींच्या दबावापुढे छोटय़ा विक्रेत्यांनीही सवलती देऊ केल्या आहेत. या सवलतीही १५ ते २५ टक्क्यांपर्यंत देण्यात आल्या आहेत.

सवलती का?

विक्रेत्यांकडे असलेल्या वस्तू या सध्या लागू असलेल्या करप्रणालीनुसार विकत घेतलेल्या आहेत. यात व्हॅट, जकात आदी करांचा समावेश आहे. १ जुलैपर्यंत जर या वस्तू संपल्या नाही तर विक्रेत्यांना त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंची नोंद दोन वेगवेगळय़ा करप्रणालीनुसार ठेवावी लागणार आहे. दुकानदार ज्यांच्याकडून वस्तू खरेदी करतात त्यांनी जर ‘वस्तू व सेवा करा’नुसार बिल दिले तर त्या वस्तूंच्या विक्रीनंतर दुकानदाराला त्याने भरलेल्या कराचा १०० टक्के परतावा मिळू शकणार आहे. पण जर जुन्या करप्रणालीतील वस्तूंची विक्री ‘वस्तू व सेवा करा’नुसार केल्यास त्यांना केवळ ६० टक्केच परतावा मिळणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी अनेकांचा खटाटोप सुरू आहे, असे अ‍ॅड. गजानन खरे यांनी सांगितले.

सोमवार बंददिवशीही बाजार खुला

मुंबई : शाळापूर्व गणवेश, बॅग, पाण्याची बाटली आदी खरेदीची लगबग संपली असताना ‘सोमवार बंद’च्या दिवशीही दादरचा मध्यवर्ती बाजार खुललेला होता. निमित्त होते ‘जीएसटीपूर्व सेल’चे.

सोमवारी संपूर्ण दादरचा बाजार बंद असतो. परंतु, दादर पूर्व आणि पश्चिमेकडील कपडे विक्रीची दुकाने सोमवारी ग्राहकांच्या गर्दीने फुललेली दिसत होती. जीएसटीच्या धसक्याने दुकानदारांनी हात सैल ठेवत दिलेल्या सवलती लुटण्याकरिता ग्राहकांनी बाजारात गर्दी केली होती. एरवी दर सोमवारी दादरमधील छोटीमोठी दुकाने बंद असतात. मात्र, सोमवारी दादर पश्चिमेबरोबरच दादरचा टीटीचा पूर्वेकडील बाजाराचा परिसर खुलला होता.

दादरमधील बहुतेक सर्वच दुकानांमध्ये कपडय़ांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली जात होती. लाईफस्टाईलच्या दुकानाबाहेर ‘जीएसटी सेलिब्रेशन सेल’ या नावाची पाटी टांगलेली होती. येथे कपडे खरेदीवर ५० टक्के सूट दिली जात आहे. इथल्या बाजूच्याच छोटय़ा मुलांच्या कपडय़ांकरिता प्रसिद्ध असणाऱ्या ‘जेलीमोली’ या दुकानाबाहेरही जीएसटी सवलतीची पाटी लावलेली दिसली. इथे पाच हजार रुपयांपर्यंत खरेदी केल्यास पाच टक्के सूट आणि पाच हजाराहून अधिक खरेदी केल्यास दहा टक्के सूट दिली जात होती.

दादर पश्चिमेला अशीच काहीशी परिस्थिती पाहावयास मिळाली. पानेरी, पल्लरी यासारख्या बडय़ा कपडे विक्रेत्यांच्या दुकानांबाहेर ५० टक्के सवलतीच्या पाटय़ा लोंबकळत होत्या. जीएसटीमुळे नेमके काय बदल होणार याची कल्पना येत नसल्याचे येथील साडीघर या दुकानाचे मालक राजन राऊत यांनी सांगितले.