महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात दुकानाच्या गाळ्यात मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी भाडय़ात सवलत देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतचा ५०० ते १००० चौरस फूट आकाराचा गाळा मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी अल्प भाडय़ाने देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात गाळ्यांना सवलतीच्या दरात भाडे आकारण्यात येईल, अशी घोषणा तावडे यांनी केली होती. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला दुजोरा देऊन याबाबत लवकर निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. मराठी भाषा विभागाने याबाबत नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठवला होता.
मराठी साहित्य आणि वाचन संस्कृतीला यामुळे चालना मिळेल. पुस्तक खरेदीचे अनेक पर्याय वाचकांना उपलब्ध होतील, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला आहे.