ऑनलाइन शिक्षणामुळे कमी ग्राहकांकडून खरेदी

निलेश अडसूळ

मुंबई : यंदाही नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात ऑनलाइन झाल्यामुळे शैक्षणिक साहित्याच्या बाजारपेठेत यंदाही निरुत्साह आहे. गेल्या वर्षभरात तुटपुंजा व्यवसाय केलेल्या व्यावसायिकांना नव्या शैक्षणिक वर्षांच्या घोषणेबरोबर निर्माण झालेली आशा मावळली आहे.

मे आणि जून महिन्यात ठिकठिकाणची शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ फु लून जाते. नव्याने आलेल्या चित्रपट, कार्टून मालिका यांनुसार तयार होणारे ट्रेंड्स वह्य़ा, पेन, कंपास पेटी, डबे, पाण्याच्या बाटल्या यांमध्ये दिसतात. यंदा मात्र बाजारात निरुत्साह आहे. कुर्ला, रेहमान स्ट्रीट यांसारख्या घाऊक बाजारपेठांमध्ये उडणारी ग्राहकांची झुंबड यंदा नावालाही दिसत नाही. वर्षभर पुरतील इतक्या वह्या, पेन, पेन्सिल, रंग आणि आवश्यक साहित्याची खरेदी ग्राहक करतात. यामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांचीही मोठी गर्दी असते. यंदा मात्र बाजारपेठांमध्ये बोटावर मोजण्याइतके ग्राहक आहेत.

‘या हंगामात आम्हाला एरवी जेवायला वेळ मिळत नव्हता. खरेदीसाठी जमलेल्या गर्दीला आवरणेही कठीण व्हायचे. पण यंदा घाऊक बाजाराची अवस्था किरकोळ दुकानदारांसारखी झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेने २० टक्केही ग्राहक नाहीत. मागणीवाचून माल पडून आहे,’ असे रेहमान स्ट्रीट येथील घाऊक व्यापारी स्टार स्टेशनरीचे जब्बार कुमार यांनी सांगितले.

किमती वाढल्या

वह्य़ांच्या किमती वाढल्या आहेत. एका वहीमागे २ ते ४ रुपये तर डझनामागे २० ते २५ रुपये वाढले आहेत. कागदाचे भाव वाढल्याने ही भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे जुना माल आहे त्यांच्याकडे जुन्याच किमती आहेत. परंतु नव्याने आलेल्या वह्यांचे दर वाढले आहेत.

कला साहित्याला मागणी

वह्या आणि शैक्षणिक साहित्यापेक्षा कला साहित्याला वर्षभर मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘नाना तऱ्हेचे रंग, चित्रकलेच्या वह्या, हस्तकलेचे कागद याला तुलनेने कमी पण वर्षभर मागणी होती. आता येणारे ग्राहकही या वस्तू आवर्जून खरेदी करत असल्याची माहिती स्टेशनरी व्यापारी अरविंद गडा यांनी दिली. परंतु हा व्यवसाय ७५ टक्के घसरला असल्याचेही त्यांनी नमूद केले. वर्षांला किमान १ कोटी रुपयांच्या मालाची विक्री व्हायची, तोच आलेख २०-२५ लाखांवर  आल्याचे ते म्हणाले.