News Flash

पृथ्वीच्या सर्वात जवळून गेलेल्या लघुग्रहाचा मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून शोध

रविवारी म्हणजे १६ ऑगस्ट रोजी हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला.

संग्रहित छायाचित्र

मुंबईच्या आयआयटीच्या कुणाल देशमुख व कृती  शर्मा या दोन विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पृथ्वीच्या सर्वात जवळून गेलेल्या लघुग्रहाचा शोध लावला आहे.

हा लघुग्रह पृथ्वीपासून २९५० कि.मी उंचीवरून गेल्यानंतर काही तासातच कॅलिफोर्नियातील झ्विकी यंत्रणेच्या (झेडटीएफ) मदतीने या लघुग्रहाचा शोध घेण्यात आला. त्याचे नामकरण २०२० क्यूजी असे करण्यात आले होते. यापूर्वी २०११ सीक्यू १ हा लघुग्रह आताच्या लघुग्रहाच्या तुलनेत पृथ्वीपासून ५४७१ कि.मी उंचीवरून गेला होता.  रविवारी म्हणजे १६ ऑगस्ट रोजी हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला.

कृती शर्मा हिचा पृथ्वीनिकट लघुग्रह शोधण्याचा हा तिसरा प्रकल्प आहे. कृती आणि कुणाल देशमुख या दोघांनी रविवारी दुपारी या लघुग्रहाच्या माहितीचे विश्लेषण झेडटीएफ यंत्रणेच्या मदतीने केले. या माहितीत संभाव्य लघुग्रहांची पाच चिन्हे (चमकदार ठिपके) दिसली. त्यातील एक पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणारा लघुग्रह असेल याची त्यावेळी कल्पना नव्हती.

मुंबई आयआयटीतील धातुशास्त्र विभागाचा विद्यार्थी कुणाल देशमुख याने सांगितले की, ‘पृथ्वीनिकट लघुग्रहांची माहिती इतरवेळा ज्या प्रकारची असते तशीच ही माहिती होती. झेडटीएफच्या चमूने त्यांची निरीक्षणे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेच्या लघुग्रह केंद्राकडे नोंदवल्यानंतर अनेक दुर्बिणींनी त्या लघुग्रहाची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. हा लघुग्रह १६ ऑगस्टला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी नऊ वाजून ३९ मिनिटांनी पृथ्वीपासून फक्त २९५० किलोमीटर इतक्या अंतरावरून गेल्याचे लक्षात आले.’

कुणालचे शालेय शिक्षण पुण्याच्या सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूलमधून झाले असून, पी. जोग ज्युनियर कॉलेजमधून त्याने बारावी पूर्ण केली. शर्मा हिने सांगितले की, ‘या शोधामुळे आम्हाला जास्तच आनंद झाला. संशोधन प्रकल्पांच्या  अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असा शोध लावण्याचा मान मिळेल अशी कल्पनाच केली नव्हती. कृती  शर्मा ही मुंबई आयआयटीत यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल) विषयातील तिसऱ्या वर्षांची विद्यार्थिनी आहे.’

या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रज्ञ व आयआयटीचे प्राध्यापक डॉ. वरुण भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. वेगवेगळ्या पाश्र्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांनी खगोल भौतिकीत मोलाचे योगदान दिले आहे. अशाच प्रकारच्या लघुग्रहांचे निरीक्षण लडाखमधील हॅन्ले येथील ग्रोथ इंडिया या दुर्बिणीच्या माध्यमातून करण्याचा आमचा इरादा आहे. असे डॉ. भालेराव यांनी सांगितले.

कसा आहे लघुग्रह?

पृथ्वीच्या सर्वात जवळून गेलेला लघुग्रह (२०२० क्यूजी) हा एसयूव्ही वाहनाच्या आकाराएवढा म्हणजे १० ते २० फूट ( ३ ते ६ मीटर) व्यासाचा असून तो पृथ्वीची हानी करण्याच्या क्षमतेचा नव्हता. पृथ्वीपासून तो २९५० कि.मी उंचीवरून गेला. तो पृथ्वीच्या दिशेने येत नव्हता पण जरी तो आपल्या वातावरणात आला असता तरी जळून गेला असता असे डॉ.वरुण भालेराव यांनी सांगितले. कॅलिफोर्नियातील झेटीएफ यंत्रणेच्या माध्यमातून रात्रीच्या आकाशाच्या लाखो प्रतिमा घेतल्या जातात त्यातील हजार प्रतिमा निवडून त्यात लघुग्रहांच्या खुणांचा शोध घेतला जातो. १६ ऑगस्टच्या अशाच छायाचित्रांचे अवलोकन करीत असताना कुणाल देशमुख, व  शर्मा यांना २०२० क्यूजी हा लघुग्रह सापडला. तैवानमधील नॅशनल सेंट्रल युनिव्हर्सिटीचे चेन येन स्यू यांचाही हा लघुग्रह शोधण्यात समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:02 am

Web Title: discovery of the closest asteroid by the students of iit mumbai abn 97
Next Stories
1 पाहा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची लाईव्ह आरती
2 पुण्यात दिवसभरात ३५ रुग्णांचा मृत्यू,१ हजार ५५६ नवे करोनाबाधित
3 करोनामुळे गणेश मूर्तींचे दर कमी, विक्रीमध्येही ३० टक्क्यांनी घट
Just Now!
X