कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांतील जैवविविधतेतील पालींच्या तीन नव्या प्रजातींचा शोध महाराष्ट्रातील तरूण संशोधकांनी लावला आहे. ‘निम्पास्पिस बंगारा‘, ‘निम्पास्पिस ग्रेनेटीकोला‘ आणि ‘निम्पास्पिस येलेगिरीएन्सिस‘ असे या नव्या प्रजातींचे नामकरण करण्यात आले असून या नव्या वैशिष्टय़पूर्ण प्रजातींच्या संशोधनामुळे ‘निम्पास्पिस‘ (डवार्फगेको) पोटजातीमध्ये ‘बंगारा‘ या नव्या गटाचा समावेश झाला आहे.

उभयसृपजीव अभ्यासक अक्षय खांडेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे, इशान अग्रवाल, आणि शौनक पाल यांनी या नव्या प्रजाती शोधल्या आहेत. जर्नल ऑफ झूलॉजिकल सिस्टिमॅटिक्स अ‍ॅण्ड इव्होल्यूशनरी रिसर्च‘ संशोधनपत्रिकेत या पालींची ओळख करून देणारा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. तेजस ठाकरे हे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनमध्ये काम करत असून  खांडेकर आणि अग्रवाल या संस्थेबरोबरच बंगळुरू येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्स इन्स्टिटय़ूट ‘ येथे संशोधन करतात, तर शौनक पाल हे ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी‘मध्ये कार्यरत आहेत.

नव्या प्रजाती या पालीच्या निम्पासिस या पोटजातीतील आहेत. कर्नाटकात सापडलेल्या प्रजातीला ‘निम्पासिस बंगारा’ अशी ओळख देण्यात आली आहे. सोनाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘कोलार‘ जिल्ह्यत ही प्रजाती आढळली. या पालीवर सोनेरी रंगछटा दिसतात आणि कन्नडमध्ये सोन्याला ‘बंगारा‘ म्हटले जाते. त्यावरून या प्रजातीचे नाव ‘निम्पास्पिस बंगारा‘ ठेवण्यात आले. आंध्रप्रदेशात सापडलेली नवी प्रजाती ग्रॅनाईट खडकांवर वास्तव्य करत असल्यामुळे तिला ‘निम्पास्पिस ग्रेनेटीकोला‘ असे नाव देण्यात आले आहे. तिसरी पाल ही तामिळनाडूमधील ‘येलेगीर‘ या थंड हवेच्या ठिकाणी सापडल्यामुळे तिला ‘निम्पास्पिस येलागिरीएन्सिस‘ अशी ओळख देण्यात आली आहे.

वैशिष्टय़ काय?

सर्वसाधारपणे पश्चिम घाटात ‘निम्पास्पिस या पोटजातीमधील पालीं दिसतात. आंध्रप्रदेशात प्रथमच‘ पोटजातीमधील पाल मिळाली आहे. नव्या प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजे त्या सगळीकडे आढळत नाहीत तर ठराविक भूप्रदेशात त्यांचे वास्तव्य असते. नव्या प्रजातींची चाचणी ‘गुणसूत्र‘ (डीएनए) आणि ‘आकारशास्त्राच्या (मॉफॉलॉजी) आधारे करण्यात आली. साधारण ४० ते ४५ मिमी आकाराच्या या पाली आहेत. छोटे किडे हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

निम्पासिस पोटजातीत नवा गट

तीन नव्या प्रजाती धरुन आता भारतात निम्पास्पिस पोटजातीत ४५ पालींची नोंद झाली आहे. या पोटजातीत सात ते आठ गटांचा समावेश आहे. एखाद्या गटात शोधलेल्या पहिल्या जीवावरून गटाचे नामकरण करण्यात येते. त्यानुसार निम्पास्पिस पोटजातीमध्ये आता ‘बंगारा’ या नव्या गटाचा समावेश झाला आहे.

आम्ही चौघे जवळपास पाच वर्षे या भागात संशोधन करत होते. आता सापडलेल्या पाली या साधारणपणे पश्चिम घाटात आढळल्या आहेत. या प्रजाती तीव्र उष्णता सहन करू शकत नाहीत. परंतु आता या पाली उष्ण प्रदेशात सापडल्या आहेत. त्याचे कारण त्या तेथील ग्रॅनाईट खडकांवर वास्तव्य करतात. या भागांतील हे खडक खाणी किंवा विकास कामांमुळे नष्ट झाल्यास या पालींसह तेथील अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.  – अक्षय खांडेकर, संशोधक