संदीप आचार्य 
मुंबई: गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ दुर्गम आदिवासी व नक्षली विभागात अवघ्या २४ हजार रुपये मानधनावर काम करणारे भरारी पथकातील बीएमएस ( आयुर्वेदिक)डॉक्टर आता करोनाची लढाईही लढत असताना आरोग्य विभाग नव्याने घेऊ पाहात असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांना मात्र ८० हजार रुपये मानधन द्यायला निघाले आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या भरारी पथकातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तसेच या अन्यायाविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दाद मागितली आहे.

करोनाचे राज्यातील वाढते रुग्ण लक्षात घेऊन आरोग्य विभागाने २९ मे रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार कंत्राटी व बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टर जर आरोग्य सेवेत दुर्गम व आदिवासी भागातील सेवेत रुजू होणार असतील तर त्यांना ८० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे तर अन्य बिगर आदिवासी भागात काम करण्यासाठी एमबीबीएस डॉक्चरांना ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय विशेषज्ञ डॉक्टरांना ९० हजार व ८५ हजार पगार दिला जाईल, असे आरोग्य विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे. गेली अनेक वर्षे दुर्गम आदिवासी भागात एमबीबीएस डॉक्टर मिळावे यासाठी आरोग्य विभागाने अनेकदा जाहिराती दिल्या. मानधनही पन्नास हजार देण्याची तयारी दाखवली होती. मात्र आरोग्य विभागाला क्वचितच एमबीबीएस डॉक्टर या भागांसाठी मिळाले आहेत. ज्यांनी ही सेवा स्वीकारली त्यातील बहुतेकजणांनी काही महिन्यातच आपल्या नोकरीला रामराम ठोकला.

आरोग्य विभागाचा खरा भाग हा ग्रामीण व दुर्गम भागात बीएएमएस डॉक्टरच प्रामुख्याने सांभाळत आहेत. त्यातही जेथे रस्ते संपतात अशा अतिदुर्गम आदिवासी व नक्षली भागातील आरोग्यसेवेचा संपूर्ण भार हा भरारी पथकातील २७३ डॉक्टर सांभाळत आहेत. यातील बहुतेकांची सेवा ही आठ ते १२ वर्षाहून अधिक काळ झाली असून त्यांना केवळ २४ हजार रुपये एवढे अत्यल्प मानधन दिले जाते. यातही आरोग्य विभागाकडून १८ हजार व आदिवासी विभागाचे सहा हजार असे २४ हजार रुपये मानधन दिले जाते. आज भरारी पथकातील हे सर्व डॉक्टर दुर्गम भागात अपुर्या सोई असतानाही करोनाशी लढत आहेत. आपल्याला सन्मानजनक मानधन द्यावे तसेच सेवेत कायम करावे अशी या डॉक्टरांची मागणी असून अनेकदा आरोग्य मंत्री व आदिवासी मंत्रीस्तरावर बैठका होऊनही अद्यापि यातून तोडगा निघालेला नाही. अशावेळी करोनाशी लढणाऱ्या आमच्या डॉक्टरांना एक पैसाही वाढ नाही आणि नव्याने येणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना ८० हजार रुपये मानधन हा आमच्यावर अन्याय असल्याचे या डॉक्टरांच्या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

“शासकीय महाविद्यालयात शिकलेल्या डॉक्टरांसाठी बंधपत्र ही अत्यावश्यक बाब असताना त्यांनाही ८० हजार रुपये मानधन देणार सरकार एक तपाहून अधिक काळ दुर्गम आदिवासी भागात सेवा देणाऱ्या भरारी पथकाच्या डॉक्टरांवर उघडउघड अन्याय करत आहेत” असे भरारी पथकाच्या डॉक्टरांचे नेते डॉ. अरुण कोळी यांनी सांगितले. “भरारी पथकातील आयुर्वेदिक डॉक्टर बाळंतपणापासून पोस्टमार्टेमपर्यमत सर्व प्रकारची आरोग्य सेवा देतो. छोट्या शस्त्रक्रियापासून ते लहान मुले व वृद्धांपर्यंत सर्वांना औषधोपचार भरारी पथकातील डॉक्टर करत असताना त्यांना केवळ २४ हजार रुपये मानधन आणि एमबीबीएस डॉक्टरांना ८० हजार रुपये मानधन हा कुठला न्याय आहे”, असा सवाल डॉ. अरुण कोळी यांनी केला.

गेल्या तीन महिन्यांपासून करोनाच्या लढाईत भरारी पथकाच्या डॉक्टरांनी स्वत: ला झोकून दिले असताना मुख्यमंत्र्यांनी तरी डॉक्टरांमध्ये भेदभाव निर्माण करू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे आमच्या व एमबीबीएस डॉक्टरांच्या कामात कोणताही फरक नसताना आमच्यावर अन्याय का, असा सवाल भरारी पथकातील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. आता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करावे लागेल असा इशाराही भरारी पथकाच्या या डॉक्टरांनी दिला आहे.