मुंबई: शिथिल केलेली टाळेबंदी, नागरिकांचा सर्वत्र खुला वावर आणि आगामी थंडी या पाश्र्वभूमीवर करोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले. परंतु संसर्ग प्रसार होत असला तरी त्याची तीव्रता तितकी दिसत नाही. तेव्हा खरेच ही लाट येणार का, याची तीव्रता काय असेल आणि यासाठी आरोग्य विभाग सक्षम आहे का, याबाबतच्या वाचकांच्या प्रश्नांना करोना विशेष कृती दलाचे सदस्य आणि मुलुंड फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पंडित उत्तरे देणार आहेत.  ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ उपक्रमात बुधवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पंडित यांच्याशी वेबसंवाद साधता येईल.

राज्यात करोना विषाणूचा शिरकाव झाला तेव्हा आरोग्य विभागाला मार्गदर्शन करण्यासाठी राज्य करोना कृती दलाची स्थापना केली गेली. त्यात फोर्टिस रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पंडित यांची  निवड झाली होती. अतिगंभीर करोना बाधितांवर उपचार करताना राज्यातील इतर डॉक्टरांना उपचाराची दिशा देण्याचे मोलाचे काम डॉ. पंडित गेले आठ महिने करत आहेत. करोनातून बरे झालेल्या रुग्णांना जाणवणाऱ्या समस्या जाणून फोर्टिस रुग्णालयात या रुग्णांसाठी बाह्य़रुग्ण विभाग उभारण्याची संकल्पनाही त्यांनी राबविली. मृत्युदर कमी करण्यासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना उपचार नियमावलीचे पालन करण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासह मार्गदर्शन केले आहे.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी  http://tiny.cc/LS_Aarogyamaanbhav_9Dec येथे नोंदणी आवश्यक.