मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी हॉटेलच्या वेळा वाढवण्या संदर्भात माध्यमांना महत्वपूर्ण माहिती दिली आहे. हॉटेलच्या वेळा वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय होणार असल्याचं शेख म्हणाले आहेत. तसेच, याबाब आगामी कॅबिनेट मिटींगमध्ये देखील चर्चा होऊन, निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

या विषयी बोलताना अस्लम शेख म्हणाले की, “हॉटेल उद्योगाची लोकं चांगली आहेत, कुठेही अडून बसलेले नाहीत. सरकारने जे जे सांगितलं, ते त्यांनी मान्य केलं. त्यांना आता आम्ही चार वाजेपर्यंत संधी दिली ते चार वाजेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवत आहेत. ते कायदेशीर मागणी करत आहेत, त्यांची विनंती आहे त्यासंदर्भात टास्क फोर्स बरोबर बोलणं सुरू आहे. उद्या, परवा केव्हाही कॅबिनेट होईल, तेव्हा यावर चर्चा करू आणि त्यांचाही वेळ आपल्याला कसा वाढवता येईल? मागर्दर्शक सूचना कशा करता येतील, हे ठरवलं जाईल.”

तसेच, “आपल्याला सर्व व्यवहार सुरू करायचे आहेत, मॉल्स, हॉटेल्स सुरू करायचे आहेत. दुकानं आपण सुरू केलेली आहेत. आता लोकलमध्ये प्रवास करण्याची देखील संधी आपण दिलेली आहे. हे सगळं करत असताना, शासनाला थोडी संधी द्यायला हवी, एकदमच आक्रमक व्हायची गरज नाही. चर्चा करून आठवडाभरात सर्व काही मार्गी लागणार आहे. आता रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यांना पास मिळणार आहेत. हॉटेल चालकांना देखील योग्य वेळी संधी दिली जाईल.” असं देखील मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी सांगितलं आहे.

राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असं राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसियांकाच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉंरंटंस असोसिएशन – आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे.