News Flash

आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत ३० वर्षांनंतर आहार बदल!

मधुमेह, डायलिसिसचे रुग्ण,हृदरुग्णांसाठी प्रमाणित आहार निश्चित करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य

पाच लाख वृद्ध व चार लाख बालरुग्णांना फायदा

राज्याच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होणाऱ्या तब्बल पाच लाख वृद्ध व चार लाख बालकांच्या आहारात बदल करून अधिक पौष्टिक व आरोग्यदायी आहार देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. हा बदल होण्यास तब्बल ३० वर्षांचा कालावधी लागला असून उशीर झाला असला तरी मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या तसेच मनोरुग्णांचा विचार करून हा बदल केल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

आरोग्य विभागाची जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, क्षय रुग्णालये व मनोरुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयांमघ्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या आहारात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मानकानुसार हे बदल करण्यात आले आहेत. गेल्या दोन दशकांत जगभरातील वैद्यकीय आहारतज्ज्ञांनी नवजात बालकांसह सहा वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी तसेच साठीपुढील वृद्ध, मधुमेहाचे व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी आहारशैली निश्चित केली आहे. ‘आयसीएमआर’नेही याबाबत सखोल अभ्यास करून भारतीय मानकांनुसार रुग्णांसाठी कोणता आहार असावा तसेच आहारात प्रथिने व अन्य पौष्टिक घटक कोणते असावे याची निश्चिती केली होती. महाराष्ट्रात आजमितीस १९९६ च्या प्रमाणित मानकानुसार शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना आहार दिला जातो.  ‘आयसीएमआर’ने २०१० मध्ये नवीन मानके तयार केली होती. मात्र, अठरा वर्षांत आरोग्य विभागाने त्याची अंमलबजावणी केली नव्हती. दरम्यानच्या काळात याबाबत आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

गटनिहाय आहाराची वर्गवारी

नव्या निर्णयानुसार स्तनपानावरील शिशुचा आहार, स्तनपान उपलब्ध नसलेल्या शिशुचा आहार, बालरुग्णांसाठी संपूर्ण आहार, कर्करोग असलेल्या बालकांसाठीचा आहार व सात ते बारा महिने वयाच्या शिशुसाठीचा आहार अशी वर्गवारी करण्यात आली आहे. प्रौढ रुग्णांसाठीच्या आहारातही कर्करुग्ण, मनोरुग्ण व जळित रुग्णांसाठी अतिप्रथिनयुक्त आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मधुमेह, डायलिसिसचे रुग्ण,हृदरुग्णांसाठी प्रमाणित आहार निश्चित करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:38 am

Web Title: disease changes after 30 years in health department hospitals
Next Stories
1 ‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन लांबणार!
2 मतदानात आर्थिक राजधानी सांस्कृतिक राजधानीपेक्षा सरस
3 दलित वस्त्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीची हवा
Just Now!
X