गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांना महाराष्ट्राचा अवमान करण्याचा आजार असून, याला त्यांनी स्वत:हून नियंत्रणात न आणल्यास महाराष्ट्रातील जनताच त्यांचा इलाज करेल, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी  जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रामुळे देशाच्या करोनाविरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागला, हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे विधान महाराष्ट्रासाठी धक्कादायक, मानहानीकारक आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे.

राज्यांना करोना लशींचा पुरवठा केंद्र सरकारकडून केला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील लशीचा साठा संपुष्टात येत असल्याने राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे अधिक लशींची मागणी करण्यात काहीही गैर नाही.