: शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने चर्चेला उत आला आहे. केंद्रीय पथकाने नाराजी व्यक्त केल्यानेच परदेशी यांची बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

करोनाविरोधी लढय़ात मुंबईत अपयशी ठरलो तर देश अपयशी ठरल्याचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे मुंबईतील परिस्थितीकडे केंद्राचे विशेष लक्ष आहे. धारावीतील स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण आणि करोनाबाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यातील अपुऱ्या प्रयत्नांसह मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत केंद्रीय पथकाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली.

केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांच्या पथकाने गुरुवारी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी व महापालिकेतील सर्व सनदी अधिकाऱ्यांची दूरचित्रसंवाद माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेला केंद्रीय पथकाने पहिल्या दौऱ्यानंतर केलेल्या सूचनांची चोख अंमलबजावणी झालेली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व सुधारणा के ल्या जातील व आवश्यक बदल होतील, असे आश्वासन दिले. या बैठकीनंतरच महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी व त्यांच्यासोबतच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्याने केंद्रीय पथकाची नाराजी निर्णायक ठरल्याचे समोर आले आहे.

धारावीतील स्वच्छतागृहे वारंवार र्निजतूक करावी लागतील हे यापूर्वीच सांगितले असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले. सर्दी, खोकला, ताप अशा लक्षणांसह रुग्णालयांत येणाऱ्यांची करोना चाचणी करण्याऐवजी त्यांना औषधे देऊन घरी सोडले. त्यातून करोना वाढला. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त लोकांचा माग काढण्यातही उदासीनता दिसली, असे आक्षेप केंद्रीय पथकाने घेतल्याचे समजते.