मुंबई : अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या मुंबईतील झोपडपट्टय़ांमध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या माध्यमातून करोनाचा प्रसार वाढण्याचा धोका लक्षात घेऊन अशा परिसरातील सार्वजनिक शौचालयांचे दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाने असे निर्जंतुकीकरण होत नसल्याबद्दल पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी परिपत्रक जारी करून सर्वच विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना शौचालयांच्या निर्जंतुकीकरणाचे आदेश दिले आहेत.

मुंबईमधील एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के जनता झोपडपट्टीत वास्तव्यास आहे. झोपडपट्टय़ांमध्ये सार्वजनिक शौचालयांची संख्या अपुरी आहे. मुंबईमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच झोपडपट्टय़ांमधील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेवर लक्ष देण्याची गरज होती. परंतु दिवसातून केवळ दोनवेळा सार्वजनिक शौचालये निर्जंतूक करण्यात येत होती. शौचालयांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे शौचालयांद्वारे करोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे, याकडे केंद्रीय पथकाने लक्ष वेधले होते. त्यानंतर आता पालिका आयुक्त चहल यांनी झोपडपट्टय़ांमधील, तसेच प्रतिबंधित क्षेत्रांतील सार्वजनिक शौचालये दर दोन तासांनी निर्जंतूक करण्याचे आदेश परिपत्रक जारी करून २४ विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

शौचालयांचे दरवाजे आतून-बाहेरून, दरवाजाच्या आतील-बाहेरील कडय़ा, हॅन्डल, नळ इत्यादी निर्जंतूक करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

झोपडपट्टय़ांमध्येच धोका

वरळी कोळीवाडा, धारावी, नागपाडा, जिजामाता नगर आदी पाठोपाठ चेंबूर, मुलुंड, बोरीवली, अंधेरी, मानखुर्द या भागातील बैठय़ा, दाटीवाटीच्या वस्त्या आणि झोपडपट्टय़ांमध्येही करोना हातपाय पसरतो आहे. मुंबईत सध्या जितका परिसर प्रतिबंधित आहे, त्याच्या सुमारे ६०टक्के  झोपडपट्टी वा दाट वस्त्यांमधील आहे. वडाळा संगम नगर, अँटॉप हिलचा परिसर, बांद्रा बेहराम पाडा, मालाड मालवणी, कुरार गाव, देवनार अशा ठिकाणी करोना रुग्ण सापडू लागले आहेत. वर्सोवा कोळीवाडा, सायन कोळीवाडा, माहीम कोळीवाडा इथे सार्वजनिक शौचालयांना काहीही पर्यायी व्यवस्था नाही.