‘एफडीए’कडून मुंबईतील २५ जिमची तपासणी; अतिसेवनामुळे होणाऱ्या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर मोहीम

मुंबई : आधुनिक यंत्रसामग्रीचा समावेश असलेल्या व्यायामशाळांमध्ये (जिम) स्टिरॉइड्स, अवैध औषधांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) व्यायामशाळांविरोधातील कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईसाठी पाच पथके तयार करण्यात आली असून या पथकांनी शनिवारी पश्चिम उपनगरातील २५ व्यायामशाळांची तपासणी केली. या वेळी दोन ठिकाणांहून प्रोटिन पावडर जप्त  करण्यात आली असून ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यूनंतर व्यायामशाळांमधील अवैध औषध विक्रीचा मुद्दा समाजमाध्यमावर चर्चेचा विषय बनला आहे. एफडीएकडे या अनुषंगाने दोन-तीन तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत एफडीएच्या मुंबई विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध विभागाकडून संयुक्तरीत्या ही मोहीम राबविण्यात येत असून यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. एक अन्न सुरक्षा अधिकारी आणि एक औषध निरीक्षक यांचा या पथकात समावेश आहे. शनिवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून पुढचे काही दिवस ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती एफडीएचे साहाय्यक आयुक्त (औषध), मुख्यालय डी. आर. गहाणे यांनी दिली.

वांद्रे ते अंधेरी या पट्टय़ातील व्यायामशाळांच्या तपासणीला शनिवारी सकाळी सात वाजता सुरुवात करण्यात आली. दिवसभरात २५ व्यायामशाळांची तपासणी करण्यात आली. दोन व्यायामशाळांमध्ये प्रोटिन पावडर वगळता काही आढळले नाही, असे गहाणे यांनी सांगितले. व्यायामशाळांमध्ये प्रोटिन पावडर वा स्टिरॉइड्स, इंजेक्शन ठेवली जात नाहीत. प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार व्यायामशाळेमध्ये येणारी व्यक्ती इंजेक्शन, प्रोटिन पावडर वा इतर औषधे घेतात. त्यामुळे २५ ठिकाणी कोणतीही औषधे आढळली नसल्याचे सांगतानाच गहाणे यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. दोन ठिकाणांहून प्रोटिन पावडर जप्त करण्यात आली असून याचा एक नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपासणी सुरू आहे. मुंबईतील सर्वच व्यायामशाळांची तपासणी करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. कारवाईतील अडथळे व्यायामशाळांमध्ये अवैध औषध विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. पण औषधांचा वापर केल्यामुळे काही त्रास झालेला आहे, अशी व्यक्ती तक्रार करताना दिसत नाही. त्यामुळे एफडीएला ठोस अशी कारवाई करता येत नाही. कारण व्यायामशाळेमध्ये कुणीही इंजेक्शन, औषध वा प्रोटिन ठेवत नाहीत. तेव्हा तपासणीसाठी गेल्यास अधिकाऱ्यांच्या हाती काही विशेष लागत नसून शनिवारच्या मोहिमेत असेच काही चित्र दिसून आले. ही मोहीम यामुळे आव्हानात्मक ठरत असली तरी व्यायामशाळांची तपासणी यापुढेही सुरूच राहणार असल्याचे गहाणे यांनी स्पष्ट केले.