ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे परखड प्रतिपादन

धरणे तसेच कोळसा, तांबे, अ‍ॅल्युमिनियम, अणुऊर्जा असे मोठे प्रकल्प उभारताना मूळ आदिवासींना विस्थापित करणे म्हणजे विकास नाही. आदिवासींनीही अशा विकासाला विरोध करून आपली मूल्ये आणि संस्कृती टिकविली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी दादर येथे केले.

[jwplayer zkvFlBpu]

साहित्य अकादमीने, दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित केलेल्या ‘आदिवासी साहित्य आणि संस्कृती’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव, साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य डॉ. विनायक तुमराम, लेखक व संशोधक मोतीराज राठोड आणि प्रसिद्ध कवी व उद्घाटन सोहळ्यातील बीजभाषणकर्ते वाहरु सोनावणे उपस्थित होते.

बीजभाषण करताना वाहरु सोनावणे म्हणाले, आदिवासींचे जीवन हे मानवी मूल्यांवर आधारित आहे. ते समजून घेणे आवश्यक आहे. आज या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण होत असून आदिवासी आणि बिगर आदिवासी साहित्यातून त्याला सक्षमपणे वाचा फुटली पाहिजे. आदिवासींचे जीवन आणि संस्कृती यांचे जतन होणे गरजेचे आहे. आदिवासी लोक निसर्ग नियमांचे पालन करून जीवन जगत असतात आणि निसर्ग म्हणजे विज्ञान आहे. मात्र तरीही आदिवासींना मागासलेले म्हणून हिणवले जाते. मोतीराम राठोड यांनी, आदिवासींच्या संदर्भातील साहित्य, संस्कृती आणि इतिहासाचे पुन्हा नव्याने लेखनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तर डॉ. तुमराम यांनी, आदिवासींचे जंगल, जमीन, जल त्यांच्याकडून हिरावून घेतले जात आहे.

आदिवासी आता जंगलांचा राजा राहिलेला नाही, अशी खंत व्यक्त केली.साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव यांनी आदिवासी साहित्य आणि संस्कृती या विषयावर राष्ट्रीय पातळीवर मेळावा घेण्याचा विचार असून आदिवासींच्या विविध भाषांमध्ये साहित्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

विकासाची व्याख्या बदलण्याची गरज

विकासाची व्याख्या नव्याने तयार करण्याची गरज असल्याचे सांगून नेमाडे म्हणाले, आंतरराष्ट्रीयतेचे वारे आपल्याकडे वाहू लागल्यानंतर आदिवासींचे शोषण सुरू झाले. मात्र हे झुगारून देऊन आपले मूळ जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘साहित्य अकादमी’ने आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमातून आदिवासी साहित्य आणि संस्कृती केंद्रस्थानी आले ही चांगली गोष्ट आहे. देशात सध्या ‘राष्ट्रीयता’ ही आंतरराष्ट्रीयतेच्या दबावाखाली निर्माण झाली आहे. ती आतून निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली

[jwplayer izOWW4O7]