नामकरणाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेला आणण्याची काँग्रेस व समाजवादी पक्षाची मागणी

मुंबई : काळाघोडा परिसरातील चौकाला इस्राएलचे दिवंगत पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचे नाव देण्यावरून पुन्हा एकदा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. समाजवादी पक्षाचा आणि काँग्रेसचा विरोध असताना या चौकाचे नामकरण करण्यात आले होते. त्यामुळे समाजवादी पक्षाने व काँग्रेसने नामकरणाचा हा प्रस्ताव पुन्हा चर्चेसाठी आणण्याची मागणी के ली आहे. या दोन पक्षांच्या नगरसेवकांनी ठरावाची सूचना मांडली असून ती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग आणि सोराबजी टाटा मार्ग यांना छेदणाऱ्या चौकाला पेरेस यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या सभेमध्ये सन २०१८ मध्ये आला होता. हे नाव देण्यावरून दोन वर्षांपूर्वी पालिका वर्तुळात राजकारण तापले होते. समाजवादी पक्ष व काँग्रेसच्या विरोधामुळे हा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी गटनेत्यांच्या बैठकीत, सभागृहात व प्रभाग समितीत फे टाळण्यात आला होता. मात्र त्यानंतर फे ब्रुवारी २०२१ मध्ये काळाघोडा परिसरातील तेथील चौकात या नावाचा फलक लावण्यात आला. याविरोधात दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला होता. मात्र तरीही हा नामकरण फलक न हटवल्यामुळे समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख व काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी नामकरणाचा ठराव  फेरविचारासाठी आणण्याची मागणी  केली आहे.