30 September 2020

News Flash

..तर पालकांना पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुभा

आयसीएसई मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षांचा वाद

(संग्रहित छायाचित्र)

आयसीएसई मंडळाच्या दहावी-बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल याचिका सोमवारी निकाली काढल्या. त्याचवेळी पर्यायी गुणांकनासाठी अवलंब करण्यात येणाऱ्या पद्धतीला आक्षेप असलेल्या वा असमाधानी असलेल्या पालकांना त्याविरोधात पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुभा असेल, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी  सर्वोच्च न्यायालयातील २६ जूनला झालेल्या सुनावणीबाबत न्यायालयाला सांगण्यात आले. या सुनावणीत आयसीएसईच्या  दहावी-बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची आणि पर्यायी गुणांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येतील, असे मंडळातर्फे सांगण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढत असल्याचे स्पष्ट केले.

परंतु परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी पर्यायी गुणांकनासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे याबाबत मंडळाने काहीही स्पष्ट केलेले नाही, असे याचिकाकर्ते अरविंद तिवारी आणि परीक्षेला विरोध करणाऱ्या अन्य पालकांनी न्यायालयाला सांगितले. तसेच याचिका प्रलंबित ठेवण्याची मागणी केली.  त्यावर उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून पर्यायी गुणांकनाच्या आधारे १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर केले जातील, असे आयसीएसई मंडळातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. शिवाय उच्च न्यायालयांत परीक्षांसंदर्भात सुरू असलेल्या याचिका निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते, असे सांगण्यात आल्यावर न्यायालयाने तिवारी यांची याचिका निकाली काढली.

तेव्हा परीक्षांचा पर्याय उपलब्ध

नजीकच्या काळात स्थिती अनुकूल असेल वा त्यात सुधारणा झाल्यास विद्यार्थ्यांंना परीक्षांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच त्यांना त्यात मिळालेले गुण हे अंतिम गुण म्हणून ग्राह्य़ धरण्यात येतील, असेही मंडळाने सोमवारच्या सुनावणीत पुन्हा  स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:21 am

Web Title: dispute of 10th 12th examinations of icse board abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘आदेशाचे पालन करा अन्यथा लाखोंचा दंड भरा’
2 मुंबई परिसरात धोका वाढला
3 लॉकडाउन की अनलॉक या संभ्रमात ठाकरे सरकार : मनसे
Just Now!
X