महसूलमंत्री चंद्रकांत पाटील – पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील मतभेद उघड

भाजप-शिवसेना युतीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात युतीची सत्ता आल्यावर पदे आणि जबाबदारीचे समसमान वाटप करण्याचे जाहीर केल्यानंतर संभाव्य मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत लगेचच कलगीतुरा रंगला आहे.

मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचे युतीत ठरलेले नाही, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात त्याबाबत सहमती झाल्याचे सांगत पाटील यांनी माहिती घेऊन बोलावे, असा सल्ला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पाटील यांना उद्देशून दिल्याने मुख्यमंत्रिपदावरून आधीच वाद रंगल्याचे चित्र आहे.

भाजप-शिवसेना युतीची घोषणा सोमवारी सायंकाळी झाल्यानंतर त्याच रात्री शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कोणाला कितीही जागा मिळाल्या तरी राज्यातील सत्ता समान कालावधीसाठी वाटून घेण्याचे ठरले, असे ट्वीट केले होते. तर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्रिपद आणि दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाला उपमुख्यमंत्रिपद मिळेल, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्रिपदावरून युतीत असलेला गुंता अधिकच वाढत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी या विषयावर भाष्य करताना, विधानसभेत युतीमध्ये ज्याचा एक आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे वाटप असा कोणतेही सूत्र ठरलेले नाही, अशा शब्दांत भाजपची भूमिका स्पष्ट केली. ..त्यामुळेच

अडीच वर्षांची अट

आमदार पाडापाडीचे उद्योग सुरू होतात म्हणून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री अशी अट उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. मुख्यमंत्री, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकटे चंद्रकांत पाटील म्हणजे भाजप नाही. पाटील यांनी माहिती घेऊन बोलावे, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदाची अट मान्य नसेल तर युती तोडावी, असा इशाराही कदम यांनी दिला. नाणार प्रकल्प रद्द करण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तरी त्याबाबतची कागदोपत्री प्रक्रियेची पूर्तता आचारसंहितेपूर्वी होईल, असे कदम यांनी नमूद केले.

ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री ही अट ठेवली तर आमदार पाडापाडीचे उद्योग सुरू  होतात म्हणून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री अशी अट उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. याबाबतचा निर्णय झाला आहे. मात्र ती अट भाजपला मान्य नसेल तर युती तोडावी.

– रामदास कदम, पर्यावरणमंत्री