केंद्रातील व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार खाली खेचण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेना-भाजप-रिपब्लिकन महायुतीत लोकसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यात माढा मतदारसंघावरून वाद सुरू असतानाच आता रिपाइंनेही ही जागा मागितल्याने तिढा आणखीनच वाढला आहे. तर मुंबईतील दोन जागांची आदलाबदली करण्यावरून शिवसेना व भाजपमध्येही धुसफुस असल्याचे समजते.
महायुतीत येण्याच्या बदल्यात राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या चार जागा मागितल्या असून त्यात माढा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघासाठी शेट्टी विशेष आग्रही आहेत. तर मागील निवडणुकीत याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवून लाखभर मते घेणाऱ्या जानकर यांनीही माढावरच दावा केला आहे. हा वाद कसा मिटवायचा याबद्दल सेना-भाजपच्या नेतृत्वाची कसरत सुरू असतानाच रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही माढा व रामटेक या दोन जागांची मागणी केल्याने महायुतीत पेचआहे.
माढाचा तिढा वाढत असताना भाजपने सेनेकडील दक्षिण मुंबई मतदारसंघ मिळावा, अशा हालचाली सुरू केल्या आहेत. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे, परंतु भाजपला आता हा मतदारसंघ हवा आहे. त्या बदल्यात भाजपचा उत्तर-मध्य मुंबई हा मतदारसंघ सेनेने घ्यावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु भाजपच्या मागणीला सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. ठिकठिकाणी महाएल्गार सभा घेऊन सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान पेटविण्यासाठी सज्ज झालेल्या महायुतीत मात्र आता जागावाटवावरून रस्सीखेच सुरू आहे.