30 September 2020

News Flash

शरद रावांच्या संघटनेत फूट

नव्या संघटनेची घोषणा ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

शरद राव

राव समर्थकांच्या नव्या संघटनेची ८ डिसेंबरला घोषणा

ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी स्थापन केलेली आणि नंतर ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांनी गाजवलेल्या म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये आता उभी फूट पडली आहे. शरद राव यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीयांना संघटनेत डावलले जात असल्याचा आरोप करीत स्वतंत्र कामगार संघटना उभी करण्यात येत आहे. निवडणूक न घेता युनियनच्या कार्यकारिणीत नेमणुका करण्यात आल्यानंतर आधीच पडलेली मतभेदांची ठिणगी आता पेटली आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी रावसमर्थक नव्या संघटनेची घोषणा करणार असून म्युनिसिपल मजदूर युनियनचा सदस्य असलेला मोठा वर्ग नव्या संघटनेत सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस, पी. डी’मेलो यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने १९५६ मध्ये म्युनिसिपल मजदूर युनियनची स्थापना केली. जगन्नाथ जाधव, बाळासाहेब दंडवते आदींच्या साथीने पालिका कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी युनियनने संघर्ष केला. तर पालिका कर्मचाऱ्यांना युनियनच्या झेंडय़ाखाली एकत्र करण्यात अब्दुल करीम नूर मोहम्मद यांचा सिंहाचा वाटा होता. मोर्चे, निदर्शने, आंदोलने, घेराव, संप अशी आंदोलनाची हत्यारे उपसून युनियनने पालिका कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पालिकेमधील ही सर्वात बलाढय़ संघटना म्हणून ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी युनियनमधील नियुक्त्या आणि अन्य कारणांमुळे काही मंडळींना पदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे युनियनमधील अनेक मंडळी दुखावली होती. पालिका कामगारांच्या वेतन करारापासून बोनसपर्यंतचे करार करताना रमाकांत बने, रंगनाथ सातवसे ही दुकली शरद राव यांच्यासमवेत होती. ही बाब अनेकांना खटकत होती. परंतु शरद राव यांच्या दराऱ्यामुळे असंतुष्ट मंडळी मूग गिळून गप्प होती. गेल्या वर्षी शरद राव यांचे निधन झाले आणि त्यानंतर हळूहळू युनियनमधील दुफळी वाढू लागली. त्यानंतर राव यांचे पुत्र शशांक राव यांच्यासह बने व सातवसे यांना युनियनबाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

हे मतभेद सुरू असतानाच युनियनच्या कार्यकारिणीची निवडणूक घेण्याचा रावसमर्थकांचा आग्रहही डावलण्यात आला. निवडणूक न घेता अध्यक्षपदी सुखदेव काशिद, सरचिटणीसपदी महाबळ शेट्टी, कार्याध्यक्षपदी वामन कविस्कर, अशोक जाधव आणि खजिनदारपदी शरद राघव यांची निवड करण्यात आली. पालिका प्रशासनाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी या पाच जणांची नावे पालिका आयुक्तांना कळविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यकारिणीतून बने यांना वगळण्यात आल्यानंतर नुकत्याच झालेल्या युनियनच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला होता व पोलिसांना पाचारण करावे लागले होते.

शरद राव यांच्या अनेक समर्थकांना युनियनमधून काढून टाकण्यात आले असून रमाकांत बने यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा देत युनियनला अखेरचा रामराम ठोकला. आता ही सर्व मंडळी नवीन कामगार संघटना काढण्याच्या तयारीत आहेत. या मंडळींनी पालिकेच्या विविध विभागांमध्ये संपर्क साधण्यास सुरुवात केली असून नव्या संघटनेची घोषणा ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

सदस्यांच्या पाच जणांच्या समितीमध्ये रमाकांत बने यांना यायचे होते. युनियनमधील ज्येष्ठ मंडळींची या समितीत निवड करण्यात आली आहे. मात्र या समितीला विरोध केल्याबद्दल रमाकांत बने यांच्याबरोबरच शशांक राव, रंगनाथ सातवसे यांना युनियनमधून काढून टाकण्यात आले.

सुखदेव काशिद, अध्यक्ष, म्युनिसिपल मजदूर युनियन

प्रशासनाशी वाटाघाटी करण्यासाठी पाच सदस्यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. पण या मागणीला तिलांजली देत आपल्याला डावलून पाच जणांची निवड करण्यात आली. मनमानी कारभार करीत कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी शरद राव यांच्यावरच आरोप केले. या साऱ्यांना कंटाळून मी संघटनेतून बाहेर पडलो.

रमाकांत बने, शरद राव यांचे समर्थक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2017 2:46 am

Web Title: disputes in sharad rao municipal labor union
Next Stories
1 तृतीय वर्षांचे निकाल यंदाही लांबणार?
2 सायबर गुन्ह्यांत आर्थिक राजधानी आघाडीवर
3 केकवरची ‘आतषबाजी’ आरोग्याला हानीकारक
Just Now!
X