संघटनात्मक नियुक्त्या करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत मुंबई भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्याशी वाद घातल्याने भाजपमधील असंतोष चव्हाटय़ावर आला.

पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत आलेल्या लोकांशी संपर्काचे काम करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे पदाधिकारी नव्याने नेमण्यात आले असून या नेमणुका करताना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता झाल्याचा आक्षेप वसंत जाधव यांनी घेताच त्यांचे समर्थक आक्रमक झाले व त्यांनी मुंबई भाजपच्या कार्यालयात आवाज उठवला. वसंत जाधव हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये आले आहेत. किसन चोपडे यांना पश्चिम महाराष्ट्र आघाडीच्या संयोजकपदी नेमण्यावरून हा वाद झाला. आधीपासून पदाधिकारी म्हणून काम करत असलेल्यांना विश्वासात घेऊन नव्या नेमणुका व्हायला हव्यात, एवढीच अपेक्षा आहे. या प्रश्नावर आठवडाभरात चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन लोढा यांनी दिल्याचे जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

तर याबाबत मंगलप्रभात लोढा यांच्याकडे विचारणा केली असता, भांडण-गोंधळ झालेले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.