दूर आणि मुक्त शिक्षण सुरू करण्याचे निकष विद्यापीठ अनुदान आयोगाने शिथिल केले असून आता राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या शंभरात स्थान मिळवणाऱ्या संस्थांनाही दूर आणि मुक्त अध्ययन विभाग सुरू करता येणार आहे.

दूर आणि मुक्त अध्ययन संस्थांसाठी नवी नियमावली आयोगाने जाहीर केली आहे. आतापर्यंत राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन प्रणालीनुसार अ श्रेणी मिळालेल्या संस्था दूर आणि मुक्त अध्ययन सुरू करू शकत होत्या. हे निकष आयोगाने शिथिल केले आहेत. सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षांत (२०२०-२१) विद्यापीठांच्या राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या शंभरात स्थान मिळवलेल्या संस्थांनाही दूर आणि मुक्त अध्ययनासाठी परवानगी देण्यात आली आहे. या संस्थांची पुढील शैक्षणिक वर्षांत (२०२१-२२) पाहणी करून आयोग नव्याने निर्णय घेणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त शिक्षण संस्थेच्या मान्यतेचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत आहे. विद्यापीठाला नॅकची श्रेणी मिळाली नसल्यामुळे संस्थेची मान्यता धोक्यात आली होती. मान्यता न मिळाल्यामुळे एका तुकडीसाठी दूरशिक्षणाऐवजी ‘बहिस्थ’ अभ्यासक्रम दाखवून पदवी देण्याची वेळ संस्थेवर आली. गेल्या वर्षी एका वर्षांपुरती म्हणजेच दोन तुकडय़ांपुरती संस्थेला मान्यता मिळाली. मात्र, त्यानंतर नॅकची श्रेणी न मिळाल्यास मान्यता जाण्याची धास्ती कायम होती.

करोना काळात नॅकची श्रेणी मिळवण्याचे विद्यापीठाचे काम काहीसे थंडावले. मात्र यंदाच्या राष्ट्रीय क्रमवारीत विद्यापीठाला पासष्टावे स्थान मिळाले. त्यामुळे आता विद्यापीठ दूर आणि मुक्त शिक्षण विभाग, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यास पात्र ठरणार आहे.