गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी असल्याची प्रतिक्रिया देणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नंतर आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. आव्हाड यांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आजपर्यंत राफेलच्या प्रकरणात अनेकांवर आरोप झाले. मात्र, पर्रिकरांच्या नावाचा उल्लेखही कोणी केला नाही. यावरुनच त्यांच्या सच्चाईची आणि सचोटीची ओळख पटते. मात्र, हा तणावच त्यांच्या शरीराला अपायकारक ठरत गेला. हा तणावच त्यांच्या शरीराला मारक ठरला व त्यांची देवाज्ञा झाली आणि एका प्रामाणिक राजकारणी व्यक्तीमत्वाला देश मुकला, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

काय म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी..

आज दुपारी मी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेचा विपर्यास करण्यात आला. माझ्या ज्या प्रतिक्रियेचा विपर्यास करण्यात आला आहे. तीच प्रतिक्रिया मी विस्तृतपणे देत आहे. रविवारी दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे र्ककरोगाशी झुंज देताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक प्रामाणिक राजकारण्याची उणीव निर्माण झाली आहे. त्यांची माझी चार ते पाच वेळा भेट झाली होती. कधी विमानतळावर.. कधी विमानात तर कधी गोव्यात मी त्यांना भेटलो होतो. हसतमुख, निर्गवी असलेले हे व्यक्तीमत्व पुस्तकात रममाण झालेले असायचे. त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं की, ते पुन्हा पुस्तकात रममाण व्हायचे. आयआयटीमध्ये शिक्षण झालेले ते अभ्यासू राजकारणी होते. ठाण्यात त्यांचा एक वर्गमित्र राहतो. त्यांच्या वर्गमित्राशी चर्चा करताना पर्रिकर यांच्या मनमिळाऊ स्वभावाची अनेकदा आठवण निघायची.

पर्रिकर यांच्या कपड्यांवरुन त्यांच्या राहणीमानाची कल्पना यायची. साधारण शर्ट आणि साधारण पँट ते वापरायचे. पायात कधी साधी चप्पल तर कधी सँडल असयाचे. एकदा एका छायाचित्रकाराने त्यांच्या तुटलेल्या चप्पलेसह त्यांचा फोटो काढला. मात्र, पर्रिकर यांनी लगेच त्या फोटोग्राफरला सांगून हा फोटो छापू नकोस, अशी सूचना केली. तो फोटो कधीच कुठे प्रसिद्ध झाला नाही. साधे राहणीमान असलेले पर्रिकर हे दिल्लीत गेले. तेथे त्यांच्या खांद्यावर संरक्षणमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. त्यांनी आपली ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडली. जो पर्यंत त्यांना बंगला मिळाला नाही. तोपर्यंत ते नौदलाच्या विश्रामगृहात राहिले. एकीकडे अनेक मंत्री पंचतारांकित हॉटेलात रहात असताना पर्रिकर हे मात्र, एका रेस्ट हाऊसमध्ये राहिले होते.

राफेलच्या संदर्भात जस-जसा आवाज उंचावू लागला. तस-तसे ते अस्वस्थ होऊ लागले. त्यातूनच ते गोव्याला रवाना झाले. आजपर्यंत राफेलच्या प्रकरणात अनेकांवर आरोप झाले. मात्र, पर्रिकरांच्या नावाचा उल्लेखही कोणी केला नाही. यावरुनच त्यांच्या सच्चाईची आणि सचोटीची ओळख पटते. मात्र, हा तणावच त्यांच्या शरीराला अपायकारक ठरत गेला… हा तणावच त्यांच्या शरीराला मारक ठरला. त्यातच त्यांना देवाज्ञा झाली अन् एका चांगल्या प्रामाणिक राजकारणी व्यक्तीमत्वाला हा देश मुकला. आज देशभर राफेलचा धुरळा उडत असतानाही त्याची साधी धूळही पर्रिकरांच्या जवळपासही गेली नाही. राफेलची बोलणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सला गेले. पण, संरक्षण मंत्री असतानाही पर्रिकर हे या वाटाघाटींमध्ये सहभागी झाले नाहीत. यावरून पर्रिकर यांच्यातील प्रामाणिकतेची साक्ष पटते. त्यानंतर ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मनातील ही अस्वस्थता त्यांनी आपल्या अनेक मित्रांजवळ बोलूनही दाखवली होती.
या प्रामाणिक व्यक्तीमत्वाला मी आदरांजली अर्पण करतो.
– जितेंद्र आव्हाड