पालिके कडून दररोज ३ लाख ६१ हजार खाद्यपाकिटांचे वाटप

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : बेरोजगार, बेघर, भिकारी आणि विविध हॉटेलांमध्ये विलगीकरणात ठेवलेल्यांना मुंबई महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या दोन वेळच्या खिचडीवर आता आजी नगरसेवक, समाजसेवक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आदी मंडळीही अधिकार सांगू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभाग कार्यालयातील खिचडीच्या मागणीमध्ये दुप्पट-तिप्पट वाढ झाली आहे. नित्यनियमाने पालिका अधिकारी-कर्मचारी आपल्या परिसरात खिचडीचे वाटप करीत आहेत. मग नगरसेवक आणि अन्य मंडळी नेमके कोणाला खिचडी खाऊ घालत आहेत, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

टाळेबंदीमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्यांच्या हाताला कामच नाही. तर बेघरांचेही अतोनात हाल होत आहेत. म्हणून पालिकेने बेरोजगार, बेघर, भिकारी, पालिका कामगार, कर्मचारी आणि हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवलेल्या नागरिक आदींना दोन वेळ जेवणाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. पालिकेने मुंबईतील ३५ कंत्राटदारांना खिचडीचा पुरवठा करण्याचे काम दिले आहे. आजघडीला दररोज दोन वेळा सुमारे तीन लाख ६१ हजार ४०० खिचडीची पाकिटे पुरविण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी निम्म्यापेक्षाही कमी खिचडीच्या पाकिटांची मागणी होती. मात्र आमच्यातर्फे खिचडी वाटप करावे, असा आग्रह नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे धरला. अखेर प्रशासनाने प्रत्येक नगरसेवकाला वाटप करण्यासाठी खिचडीची ५०० पाकिटे देण्याची सूचना केली. मात्र नगरसेवकांपाठोपाठ त्यांचे कार्यकर्ते, समाजसेवक, माजी नगरसेवक आदी मंडळीही खिचडीच्या पाकिटांची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागातून कंत्राटदाराला प्रतिदिन दुपटीपेक्षा अधिक खिचडीच्या पाकिटांचा पुरवठा करण्याची सूचना करण्यात येत आहे.

पालिकेचे अधिकारी-कर्मचारी नित्यनियमाने आपापल्या विभागात फिरून बेरोजगार, बेघर, भिकारी यांना दोन वेळ खिचडीचे वितरण करीत आहेत. त्याशिवाय हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवलेल्यांना खिचडी देण्यात येत आहे. काही विभागांतील नगरसेवक एक हजार ते १३०० खिचडीची पाकिटे घेत आहेत. काही वेळा आयत्या वेळी नगरसेवक  खिचडीच्या अधिक पाकिटांची मागणी करीत आहेत. त्यांना खिचडीचा पुरवठा करताना संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. काही विभाग कार्यालयांसाठी प्रतिदिन २० हजारांहून अधिक खिचडीची पाकिटे उपलब्ध करावी लागत आहेत, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.