मुंबई आणि ठाणे परिक्षेत्रातील शिधापत्रिका नसलेली कुटुंबे व विस्थापित मजुरांना १० जुलैपर्यंत मोफत तांदूळ व अख्खा चणा वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती नागरी पुरवठा विभागाचे शिधावाटप नियंत्रक आणि संचालक कैलास पगारे यांनी दिली.

करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी देशात व राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय अन्नसुरक्षा किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेत समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे.

मुंबई व ठाणे परिक्षेत्रात आतापर्यंत १०५८ मेट्रिक टन मोफत तांदळाचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच या योजनेअंतर्गत मे आणि जून या महिन्याकरिता प्रतिकुटुंब प्रतिमाह १ किलो मोफत अख्खा चण्याचे वाटप सुरू आहे. ही मुदत १० जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांमधून कोणतीही गर्दी न करता, अंतरनियमांचे पालन करून तसेच मुखपट्टय़ांचा वापर करून लवकरात लवकर धान्य प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन नियंत्रक-संचालक कैलास पगारे यांनी केले आहे.