बालभारतीच्या पाठय़पुस्तकांचे वितरण सोमवारपासून सुरू झाले असून सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकांबरोबरच किरकोळ विक्रीसाठीही बालभारतीने वितरण सुरू केले आहे.

बालभारती सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीची पाच कोटी पुस्तके शाळांना देते. विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या या पुस्तकांचा खर्च शासन करते. या पुस्तकांचे वितरण सोमवारपासून सुरू करण्यात आले. दरवर्षी १५ जून रोजी शाळा सुरू होतात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येतात. त्यापूर्वी प्रत्येक विभागातील वितरण केंद्र, तेथून केंद्रशाळा, शाळा असे वितरण केले जाते. यंदा शाळा उशिरा सुरू होणार असल्या तरीही १५ जूनपर्यंत पाठय़पुस्तके देण्याच्या दृष्टीने बालभारतीने नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे शालेय वस्तू, पाठय़पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्येही पुस्तकांचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. राज्याच्या काही भागांतील शालेय साहित्याची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. ‘सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकांबरोबरच अनेक विक्रेते पुस्तकांची मागणी करत आहेत. त्यांनाही पुस्तके पुरवण्यात येणार आहेत. त्यानुसार विविध भागांतील वितरण केंद्रांचे काम सुरू झाले आहे,’ असे बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले.

पुस्तके द्यायची कशी?

बालभारतीने पुस्तके वितरण केंद्रावर उपलब्ध केली तरी सध्याच्या परिस्थितीत ती शाळांपर्यंत कशी पोहोचणार? अनेक ठिकाणी शाळांमध्ये अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, तेथे पुस्तके कुठे ठेवणार? विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके कशी पोहोचवणार असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.