जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आज विचित्र युत्यांचे संकेत

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी उद्या निवडणूक होत असून, आठ जिल्हा परिषदांमध्ये चित्र स्पष्ट असले तरी १७ ठिकाणी कोणता राजकीय पक्ष कशी भूमिका घेतो यावर सारे अवलंबून राहणार आहे. पंचायत समित्यांच्या सभापतींप्रमाणेच चित्रविचित्र युत्या किंवा आघाडय़ा अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत.

चंद्रपूर, वर्धा आणि लातूर या तीन जिल्हा परिषदांमध्ये भाजप, पुणे आणि साताऱ्यात राष्ट्रवादी, सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस तर रत्नागिरीमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले आहे. यामुळे या सात जिल्हा परिषदांमध्ये चित्र स्पष्ट आहे. रायगडमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी होती आणि या आघाडीला बहुमत मिळाले आहे. जळगावमध्ये ६७ पैकी भाजपला ३३ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी एकच सदस्य कमी आहे. तेथेही भाजपला काही अडचण येणार नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही जिल्ह्य़ांमध्ये स्थानिक पातळीवर धुसफूस सुरूच आहे. कोण कोणाला पाठिंबा देईल हे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी समजेल ही काँग्रेसच्या एका नेत्याची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.

 कोणत्या जिल्ह्य़ात कशी परिस्थिती ?

नाशिकमध्ये युती झाल्यास त्याचा शिवसेनेला फायदा होईल. सांगली जिल्ह्य़ात भाजपने संख्याबळ जमविले आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून आले असले तरी राष्ट्रवादीतच बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरमध्ये भाजपचा अध्यक्ष निवडून आणण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. औरंगाबाद आणि जालन्यात युती झाल्यास त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून आले असले तरी माजी आमदार सुरेश धस यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे. धस यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना फायदा होऊ शकतो.  गडचिरोली जिल्ह्य़ात भाजपने छोटय़ा पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सारी ताकद पणाला लागली आहे. यवतमाळमध्ये शिवसेनेचे २० तर भाजपचे १७ सदस्य निवडून आले आहेत. दोन्ही पक्षांनी सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नांदेड आणि अमरावती जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले असून, दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये अध्यक्षपद मिळण्यात अडचण येणार नाही. नगर जिल्ह्य़ात काँग्रेसला रोखण्याकरिता वेगळी समीकरणे अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तविली जाते. उस्मनाबादमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करणार का, हा कळीचा मुद्दा आहे.

गेल्या आठवडय़ात झालेल्या पंचायत समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजप, राष्ट्रवादी-भाजप, शिवसेना-काँग्रेस अशी विचित्र समीकरणे तयार झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषदांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजप आणि शिवसेनेत समेट?

कर्जमाफीच्या मुद्दय़ावर शिवसेनेने दोन आठवडे विधिमंडळ अधिवेशनात भाजपच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली होती. पण अर्थसंकल्प सादर होताना शिवसेनेने शांत बसण्याची भूमिका घेतली. भाजपप्रमाणेच शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी जादा निधी देण्याचे आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आल्याचे शिवसेनेच्या आमदारांकडून सांगण्यात येते. अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्ष एकत्र राहावेत म्हणून भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून ताणले गेलेले संबंध गेल्या तीन-चार दिवसांत बऱ्यापैकी निवळले आहेत. यामुळेच दोन्ही पक्षांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा भाजपला अधिक फायदा होऊ शकतो. युतीतील दोन पक्ष एकत्र राहिल्यास त्याचा भाजपला अधिक फायदा होऊ शकतो. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर शिवसेनेचा भर आहे. शिवसेना कोणती भूमिका घेते याकडे भाजपचे लक्ष आहे.

बीडमध्ये धनंजय मुंडेंना धक्का; कोल्हापूरमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला

बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून आले असले तरी माजी आमदार सुरेश धस यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे. धस यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना फायदा होऊ शकतो. तसेच कोल्हापूरमध्ये भाजपचा अध्यक्ष निवडून आणण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.