करोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर प्राणवायू (ऑक्सिजन) मिळावा तसेच अखंडितपणे सुरू राहावा यासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० डय़ुरा सिलेंडर आणि २०० मोठय़ा आकाराचे सिलेंडरचा राखीव साठा ठेवण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.

राज्यात विशेषत: ग्रामीण भागात गंभीर रुग्णांना वेळेवर प्राणवायू मिळत नसल्याच्या मोठय़ाप्रमाणात तक्रारी येत असून त्याची दखल घेत राज्यभरात कोठेही प्राणवायूची कमतरता भासू नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. टोपे यांनी राष्ट्रीय प्राणवायू उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांसोबत दूरचित्र संवादाच्या माध्यमातून चर्चा करून राज्याला पुरेशा प्रमाणात प्राणवायू पुरवठा व्हावा यासाठी सूचना के ल्या. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राणवायू पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० डय़ुरा सिलेंडर आणि २०० मोठय़ा सिलेंडरचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात आढळणाऱ्या करोना रुग्णांपैकी सरासरी किती रुग्णांना प्राणवायू खाटा लागतात याचा आढावा घेऊन प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात त्यानुसार प्राणवायू खाटा उपलब्ध असाव्यात याबाबतही उपाययोजना केल्या जात आहेत. प्राणवायू पुरवठा नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग, परिवहन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य या विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राणवायू पुरवठय़ामध्ये समन्वय साधण्यासाठी विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याच प्रकारे समितीचे गठन करण्यात आले आहे. राज्यस्तरावर आरोग्य सेवा आयुक्त यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग आणि परिवहन अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

जिल्हास्तरावर ‘ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट’ तसेच  ठोक पुरवठादार यांची यादी  केली आहे.  जिल्हावार समन्वय अधिकारी नेमण्यात आल्या आहेत, असेही टोपे म्हणाले. राज्यस्तरावर अन्न व औषध प्रशासनामार्फत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५९२३६४,  तर टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ असा आहे.  सध्या राज्यात  प्राणवायूचे १७ हजार ७५३ मोठे, १५४७ मध्यम तर डयुरा सिलिंडर २३० असून, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक्स १४ असून आणखी १६ ठिकाणी काम सुरू असल्याचेही टोपे यांनी सांगितले.