पावसाळ्यात विशेष खबरदारी, पूल निरीक्षक नेमणार 

संजय बापट, मुंबई</strong>

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसलगतच्या हिमालय पूल दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर पावसाळ्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी विशेष पथकांमार्फत राज्यातील सर्व पुलांच्या सुरक्षिततेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येणार आहे. पुराचा धोका असलेल्या पुलांच्या ठिकाणी २४ तास पूल निरीक्षक नेमण्यात येणार असल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल ऑगस्ट २०१६मध्ये कोसळल्यानंतर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्या वेळी सर्वच पुलांची संरचनात्मक तपासणी करून धोकादायक पुलांची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. त्यानुसार अनेक पुलांची दुरुस्ती, पुनर्बाधणी करण्याचे काम सुरू झाले असतानाच गेल्याच आठवडय़ात मुंबईत ‘हिमालय पूल’ दुर्घटना घडली. त्यानंतर पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पावसाळ्यात पूलदुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरातील अभियंत्यांना कामाला लावले आहे. पावसाळ्यापूर्वी विभागाच्या आधिपत्याखालील रस्त्यांवरील सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यात कुचराई केल्यास आणि एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या राज्यातील बरेचसे पूल सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी बांधलेले असले तरी काही पूल मात्र ब्रिटिशकालीन आहेत. वाहतुकीचा वाढता ताण, नदीच्या पात्रातील वाळू उत्खनन इत्यादी कारणांमुळे गेल्या चार-पाच वर्षांत काही पूल कोसळून त्यांत मोठय़ाप्रमाणात हानी झाली आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्याच्या सूचना विभागाने एका पत्रान्वये दिल्या असून त्यात दोन अडीच महिन्यांत पुलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा आराखडाही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पूलदुर्घटना टाळण्यासाठी.. 

’ पुलांची संरचनात्मक तपासणी

’ दुरुस्त्यांसाठी प्रत्येक जिल्ह्य़ात अभियंत्यांची खास पथके

’ पुराचा धोका असलेल्या ठिकाणी पावसाळ्यासाठी पूल निरीक्षक

’ पुराने धोक्याची पातळी ओलांडल्यास पूल निरीक्षक वाहतूक थांबवणार

’ पुलावरून पुराचे पाणी गेल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची खात्री करणार

’ सुरक्षिततेची खात्री झाल्यावरच वाहतुकीस परवानगी

’ धोकादायक पुलांची तातडीने दुरुस्ती