16 December 2017

News Flash

दिवा लोकलला लाल दिवा

नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच दिवा स्थानकात झालेले जनआंदोलन शमवण्यासाठी राजकीय नेत्यांनी ‘दिवा लोकल’ सुरू करण्याची

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 8, 2015 4:11 AM

नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच दिवा स्थानकात झालेले जनआंदोलन शमवण्यासाठी राजकीय नेत्यांनी ‘दिवा लोकल’ सुरू करण्याची घोषणा करत आशेचा ‘दिवा’ प्रवाशांच्या मनात पेटवला असला, तरी रेल्वेसमोरच्या असंख्य तांत्रिक अडचणींमुळे ही गाडी सध्या सुरू होणे शक्य नाही.
गेल्या आठवडय़ात दिवा स्थानकावर झालेले जनआंदोलन शमवण्यासाठी राजकीय नेत्यांनी दिवा येथून लोकल गाडी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी रेल्वेशी पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र दिवा लोकल चालवण्यात अडचणी असल्याचे रेल्वेचे अधिकारीच सांगत आहेत. सध्या गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वेवर एका तासात १०३ फेऱ्या चालवल्या जातात. त्यामुळे या वेळेत एखादी दिवा लोकल सुरू करायची म्हटली, तर डोंबिवली, कल्याण किंवा ठाणे यांपैकी एखाद्या स्थानकातून सुटणारी सेवा कमी करावी लागेल.
दिवा येथे ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा दोन येथे थांबवल्यास अप किंवा डाऊन धिमी मार्गिका अडकून पडते. गर्दीच्या वेळी या गाडीच्या गार्ड आणि मोटरमनला आपापल्या केबिन बदलण्यासाठी तीन ते चार मिनिटांचा कालावधी लागेल. तसेच केबिनचा ताबा घेतल्यावर काही कामे करण्यासाठीही एवढाच वेळ लागतो. त्यामुळे किमान दहा मिनिटे ही गाडी एक मार्गिका अडवून धरेल. त्याचा परिणाम इतर फेऱ्यांवर होईल.
दिवा-रोहा गाडीसाठीच्या प्लॅटफॉर्मवर ही गाडी थांबवण्याचा पर्यायही रेल्वे चाचपत आहे. मात्र डाऊन धिम्या मार्गावरून जाणारी गाडी या प्लॅटफॉर्मवर घेण्यासाठी पूर्ण पाच मार्गिका ओलांडाव्या लागतील. यात दोन ते चार मिनिटे वेळ जाणार आहे. तसेच पुन्हा ही गाडी अप धिम्या मार्गावर आणण्यासाठीही एवढाच वेळ जाईल. त्यासाठी सध्याच्या रुळांच्या रचनेत बदल करावा लागेल, असे अधिकारी सांगतात. मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर याबाबत विचार होऊ शकतो, असेही रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे.
*दिवा स्थानकात ‘होम प्लॅटफॉर्म’ नाही. त्यामुळे येथे एक गाडी थांबवून ती पुन्हा मुंबईकडे वळवणे कठीण आहे.
*याचा परिणाम अन्य उपनगरी सेवांवर होऊ शकतो.
*त्यामुळे पाच लाख प्रवाशांच्या सोयीसाठी ३० लाख प्रवाशांचा रोष रेल्वे प्रशासनाला सहन करावा लागेल, अशी भीती रेल्वे प्रशासनाला आहे.

पुन्हा दिरंगाई
माटुंगा आणि मुलुंड या मार्गावरील रेल्वे रूळाला बुधवारी सकाळी सातच्या सुमारास तडा गेला आणि मध्य रेल्वे विस्कळीत झाली.  हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी लागला. या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिरा सुरू होती.

First Published on January 8, 2015 4:11 am

Web Title: diva local railway gets red signal