दिवा स्थानकात प्रवाशांच्या आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या दंगेखोरांना शोधण्याचे काम रेल्वे पोलिसांनी चिकाटीने सुरू केले आहे. या उद्रेकाचे सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर चित्रीकरण यांच्या साहाय्याने रेल्वे पोलीस आता या आरोपींना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. रेल्वे पोलिसांचा गुन्हे विभाग आणि लोहमार्ग पोलीस यांची खास पथके या कामी तैनात करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे काही दंगेखोरांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहेत.  
दिवा स्थानकात प्रवाशांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले. या आंदोलनावेळी रेल्वेची एटीव्हीएम यंत्रे, तिकीट विक्री केंद्रे, रेल्वेगाडय़ा यांची नासधूस करण्यात आली. तसेच काही प्रवासी आणि पोलिसांनाही मारहाण करण्यात आली होती. हे आंदोलन केवळ स्थानकापुरते मर्यादित न राहता परिसरात पसरले होते. पोलिसांच्या गाडय़ा पेटवणे, प्रवाशांसह पोलिसांनाही मारहाण करणे, आदी कामे रेल्वेचे प्रवासी करणार नाहीत, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला होता. आता या सर्व उद्रेकाचे चित्रीकरण पोलिसांना मिळाले आहे. त्याआधारे रेल्वे पोलीस गुन्हेगारांचा तपास करीत आहेत.
पोलिसांनी त्यासाठी साध्या वेशातील काही पथके रेल्वे गाडय़ांमध्ये तैनात केली आहेत. हे पोलीस सकाळच्या वेळी या मार्गावरील गाडय़ांमध्ये प्रवास करीत आहेत. पोलिसांकडे चित्रीकरण असून त्यात काही चेहरे स्पष्ट दिसत आहेत. पोलीस आता या गर्दीत ते चेहरे शोधून त्यांना अटक करीत आहेत. मात्र यापैकी काही दंगेखोर भूमिगत झाल्याचा संशय  आहे. मात्र पोलीस त्यांचा छडा लावतील, असा विश्वास रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी व्यक्त केला.