महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सहा विभागस्तरीय कार्यालये जागतिक महिला दिनाच्या दिवशी ८ मार्च रोजी कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त कार्यालयात सुरू होत आहेत.

अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत, अशी संकल्पना यशोमती ठाकूर यांनी मांडली होती. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिलादिनी एकाच दिवशी कार्यान्वित करण्यात येत आहेत.

मुंबई हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण नसल्यामुळे अत्याचारपीडित महिलांना महिला आयोगाकडे दाद मागायची असेल तर सुलभ संपर्क साधणे कठीण जात होते. तथापि, आता विभागीय कार्यालये सुरू होत आहेत.

विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त कार्यालयात महिला आयोगाची कार्यालये सुरू करण्यात येत आहेत.