25 September 2020

News Flash

ओला-उबर सेवा बेकायदा!

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा दावा, वादाची शक्यता

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा दावा, वादाची शक्यता

काही महिन्यांपूर्वी संप करून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या ओला-उबर चालकांच्या मागण्यांवर तोडग्या काढण्याचे आश्वासन देणारे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या दोन्ही सेवा बेकायदा असल्याचे सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

सोमवारी ३०व्या राज्य रस्ते सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करताना रावते म्हणाले, ‘ओला आणि उबर सेवा बेकायदा असल्याने त्यांच्या बाबतीत कोणताही वाद नाही. या सेवांमुळे स्थानिक टॅक्सी-रिक्षा सेवेचा व्यवसाय मंदावला आहे.’ आम्ही एक शहर टॅक्सी योजना राबवत आहोत. त्याअंतर्गत सीएनजीवर वाहन चालवायचे असेल तर चालवा, अन्यथा परवानगी मिळणार नाही, असेही रावते म्हणाले.

ओला-उबर चालकांनी नोव्हेंबर २०१८मध्ये संप पुकारला होता. त्या वेळी रावते यांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी संप स्थगित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतही  महाराष्ट्र राष्ट्रीय कामगार संघटना आणि मराठी कामगार सेनेलाही मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

ओला-उबरचालकांनी संप स्थगित केल्यानंतर रावते यांनी सर्व टॅक्सी सेवांसाठी एकच शहर टॅक्सी योजना २०१७ प्रस्तावित असल्याचे जाहीर केले होते. सरकारच्या या प्रस्तावित योजनेला ओला-उबरचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळवली होती. ही स्थगिती तात्काळ उठवण्यासंदर्भात परिवहन विभागाने कार्यवाही करावी. तसेच ओला-उबर सेवाचालकांनी तयारी दर्शविल्यास त्यांची ‘कुल कॅब’ म्हणून नोंदणी करण्यासंदर्भात चाचपणी करावी. जेणेकरून त्यांचा व्यवसाय टिकवता येईल, असेही त्या वेळी रावते म्हणाले होते.

ओला-उबर सेवांना ‘ऑल इंडिया टॅक्सी परमिट’ आहे. त्यानुसार त्यांनी शहराबाहेर सेवा दिली पाहिजे. मात्र त्या शहरातच धावतात म्हणून त्या बेकायदा ठरतात. त्यांना शहर टॅक्सी योजनेत येण्याचे आवाहन केले होते. या योजनेंतर्गत त्यांच्या टॅक्सी सीएनजीवर चालवाव्या लागतील. अन्यथा त्यांना परवानगी मिळणार नाही. त्यांच्याबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नाही.  – दिवाकर रावते, परिवहनमंत्री

पुन्हा संपाचा पवित्रा

ओला-उबरचालकांच्या मागण्या अजूनही प्रलंबित असल्याने ते संपाच्या पवित्र्यात आहेत. या पाश्र्वभूमीवर ओला-उबर सेवा बेकायदा असल्याच्या रावते यांच्या विधानाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:52 am

Web Title: diwakar raote comment on ola uber
Next Stories
1 बांधकाम क्षेत्रातील मंदीचा महापालिकेला फटका
2 यंत्रणांनी आदेश दिल्यास राजकीय मजकूर हटवू!
3 करवाढ नाही, पण सेवाशुल्कांचे संकेत
Just Now!
X