मुंबई : लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी  व निवडणुकीच्या तयारीसाठी  शिवसेनेने संघटनात्मक फेरबदल सुरू केले असून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा व सांगली या चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघांसाठी दिवाकर रावते यांची तर विदर्भातील पाच मतदारसंघांसाठी खासदार गजानन कीर्तिकर यांची संपर्कनेते म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. कीर्तिकर यांच्याकडे भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, रामटेक व नागपूर या पाच लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. नुकतीच सार्वजनिक एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे व पालघर जिल्ह्य़ातील चार मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

पंतप्रधानांकडून उद्धव ठाकरे यांचे आभार

राज्यसभेतील उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआचे उमेदवार हरिवंश सिंह यांना मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून त्यांचे आभार मानले. या निवडणुकीत रालोआचे उमेदवार म्हणून संयुक्त जनता दलाचे हरिवंश सिंह हे विजयी झाले. विरोधी पक्षांनी उमेदवार दिल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट झाल्यावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून रालोआच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती केली होती. हरिवंश सिंह यांच्या विजयानंतर खुद्द पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे यांना दूरध्वनी केला. युतीमधील कटुतेच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेशी सुसंवाद ठेवण्याच्या धोरणाचाच तो एक भाग असल्याचे मानले जात आहे.