महागाई भत्त्याची ९ महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय

राज्यातील शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी राज्य सरकारने गोड बातमी दिली आहे. गेल्या नऊ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनात रोखीने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वित्त विभागाने सोमवारी तसा आदेश जारी केला. या निर्णयाचा राज्यातील १७ लाख अधिकारी, कर्मचारी आणि साडेसहा लाख निवृत्तिवेतनधारकांना आर्थिक लाभ मिळणार आहे.

केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे धोरण राज्य सरकारने पूर्वीपासूनच स्वीकारले आहे. परंतु अलीकडे राज्याची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे कारण सांगून केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात खंड पाडला जात आहे. अलीकडेच १६ ऑक्टोबरला राज्य सरकारने १ जानेवारी २०१८ पासून केंद्र सरकारने जाहीर केलेला तीन टक्के महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना देण्याचा आदेश काढला. परंतु  सप्टेंबपर्यंतची नऊ महिन्यांची थकबाकी देण्याबाबत निर्णय राखून ठेवला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती.

गेल्याच आठवडय़ात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन विविध मागण्यांबरोबरच दिवाळीचा सण तोंडावर आल्याने मागील नऊ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने द्यावी, अशी त्यांना विनंती केली. त्यावर मुनगंटीवार यांनी थकबाकी देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानुसार सोमवारी तसा आदेश जारी करण्यात आला.

या निर्णयानुसार जानेवारी ते सप्टेंबपर्यंत तीन टक्क्यांप्रमाणे नऊ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी अधिकारी, कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना मिळेल. साधारणत वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना आठ ते नऊ हजार रुपये, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना सहा ते सात हजार आणि वर्ग तीन व चारच्या  कर्मचाऱ्यांना अडीच ते पाच हजार रुपयांपर्यंत थकबाकी मिळेल, असे महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी सांगितले. त्याशिवाय तीन टक्के महागाई भत्तावाढीमुळे वेतनातही वाढ मिळणार आहे. या थकबाकीचा राज्यावर साधारणत: ७५० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे कुलथे यांनी स्वागत केले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागयांबाबत राज्य सरकारने अशाच प्रकारे सकारात्मक व तत्परतेने निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.