करोना संसर्गाविरोधातील लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर झाला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना १५,५०० रुपये, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ७,७५० रुपये, मनपा प्राथमिक शिक्षक सेवक ४७०० रुपये, अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक २३५० रुपये, सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज म्हणून ४४०० रुपये देण्यात येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

करोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. करोनाकाळात प्राणाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. बोनसमुळे पालिकेच्या तिजोरीवर १५५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. करोनामुळे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटले असले तरी कर्मचाऱ्यांना मात्र बोनस देण्यात येईल.