१९९६ च्या शासन निर्णयाचा अडथळा

दिवाळी सणाच्या तोंडावर महागाई भत्त्याची नऊ महिन्यांची थकबाकी देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला, परंतु ऑक्टोबरची वेतन देयके आधीच कोषागराला सादर झाल्यामुळे ही रक्कम मिळण्यासाठी आता पुढील महिन्याची वाट बघावी लागणार आहे. वेतन देयके सादर झाल्यानंतर स्वतंत्रपणे थकबाकी देण्यास राज्य शासनाच्याच १३ मे १९९६ च्या निर्णयाचा अडथळा निर्माण झाला आहे. राज्य शासनाने त्यात सुधारणा करुन दिवाळी सणासाठी थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे यांनी केली आहे.

केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे धोरण असले तरी, त्यात अलीकडे सातत्याने खंड पडत आहे. जानेवारी २०१८ मध्ये जाहीर झालेला  तीन टक्के महागाई भत्ता ऑक्टोबरपासून देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सप्टेंबपर्यंतच्या नऊ महिन्यांच्या थकबाकीचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. दिवाळी सण तोंडावर आल्याने थकबाकी मिळावी, अशी मागणी महासंघाने अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली आणि महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा शासन आदेशही जारी करण्यात आला.

दिवाळी सणाच्या तोंडावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना  ऑक्टोबरच्या वेतनात थकबाकीची रक्कम मिळावी, अशी अपेक्षा होती. परंतु त्यात १३ मे १९९६ च्या शासन आदेशाचा अडथळा निर्माण झाला आहे. वेतन देयके कोषागराला सादर झाल्यानंतर, त्या महिन्यात महागाई भत्त्याच्या थकबाकीची स्वतंत्र देयके न काढता ती पुढील महिन्याच्या वेतनासोबत काढावीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या २२ ते २६ तारखेपर्यंत वेतनाची देयके कोषागराला सादर केली जातात. महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा शासन आदेश २९ ऑक्टोबरला निघाला आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या वेतनात थकबाकी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. ज्यांची ३० ऑक्टोबरला देयके सादर झाली असतील त्यांना थकबाकी मिळेल, परंतु ती संख्या पाच टक्कयांपेक्षा जास्त असणार नाही, याकडे कुलथे यांनी लक्ष वेधले. दिवाळीच्या सणासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना थकबाकी मिळण्यासाठी १९९६ च्या शासन आदेशात तशी सुधारणा करावी, अशी मागणी महासंघ्याच्या वतीने अर्थ मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर जुलैमध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेला महागाई भत्ताही देण्यात यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.